उन्नावमधील ‘निर्भया’चा अखेर मृत्यू…!


उन्नाव – उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये काही महिन्यांपूर्वी एका तरुणीने दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या नराधमांना पोलिसांनी अटक देखील केली होती. पण काही दिवसांपूर्वीच हे नराधम जामीनावर सुटून बाहेर आले होते. त्यानंतर त्या दोन नराधमांनी आपल्या 5 साथीदारांच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी पीडितेला रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पीडिता 90 टक्के भाजली होती. पण त्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. तिने दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उन्नावमधील या घटनेमुळे देशभर खळबळ उडाल्याने याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. विमानाद्वारे तत्काळ दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात पीडितेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. पण, पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिची प्राणज्योत गुरूवारी रात्री 11.40 मिनिटांनी मालवली. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम त्रिवेदी, शिवम त्रिवेदी, हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर वाजपेयी आणि उमेश वाजपेयी अशी आरोपींची नावे आहेत.

Leave a Comment