बॉलीवूड खिलाडी अक्कीने भारतीय पासपोर्टसाठी केला अर्ज


बॉलीवूडचा खिलाडी आणि रसिकांचा आवडता अभिनेता अक्षयकुमार उर्फ अक्की याने भारताचा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज केला असल्याचे दिल्लीतील एका कार्यक्रमात जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत त्याने मतदान केले नाही कारण त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नसून कॅनडाचे नागरिकत्व असल्याचा खुलासा त्याने केल्यानंतर याच्या नागरिकत्वावरून वाद, चर्चा सुरु झाल्या होत्या आणि या संदर्भात त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

याला उत्तर देताना अक्षयने असा खुलासा केला. तो म्हणाला माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून मला ट्रोल केले गेले मात्र काही कारणामुळे मला कॅनडाचे नागरिकत्व घेणे भाग पडले होते. त्यावेळी माझे १४ चित्रपट फ्लॉप झाले होते आणि येथे आता आपल्या करियरला काही वाव नाही असेच मला वाटत होते. त्यावेळी कॅनडामध्ये असलेल्या माझ्या मित्राने कॅनडात येण्याचा सल्ला दिला. तेथे आम्ही दोघे काही व्यवसाय करणार होतो पण दरम्यान त्याच वर्षी माझा १५ वा चित्रपट खुपच चालला. हा चमत्कारच होता. त्यामुळे मी कॅनडाला जाणे रहित केले पण पासपोर्ट बदलून घ्यावा असे मला वाटले नव्हते.

माझ्या नागरिकत्वावरून वाद सुरु झाल्याने मी भारतीयच आहे हेच मला सांगायचे आहे. त्यासाठी मला भारतीय पासपोर्ट दाखवायचा आहे. यापुढे या मुद्द्यावरून कुणालाही माझ्यावर टीका करण्याची संधी मला द्यायची नाही. अक्षयचा गुड न्यूज हा चित्रपट येत्या नाताळात प्रदर्शित होत असून त्यात त्याच्यासोबत करीना कपूर नायिकेच्या भूमिकेत आहे.

Leave a Comment