स्टीव्ह जॉब्सची सही असलेल्या फ्लॉपीडिस्कचा ६० लाखांना लिलाव


अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स याची सही असलेली फ्लॉपीडिस्क तब्बल ६०.१४ लाख किमतीला विकली गेली. आरआर ऑक्शन कंपनीने गेल्या आठवड्यात या डिस्कचा लिलाव जाहीर केला तेव्हा त्यांना ७५०० डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात लिलाव पुकारला गेल्यावर अपेक्षेच्या १२ पट अधिक किमतीला म्हणजे ८४११५ डॉलर्सना तिची शेवटची बोली लागली. या डिस्कमध्ये मॅकेंटॉश सिस्टीम टूल व्हर्जन ६.० ची एक कॉपी सेव आहे असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार जॉब्स फारच थोडे वेळा सही करत असे. या फ्लॉपीडिस्कवर त्याने काळ्या पेनाने सही केली असून ती स्पष्ट दिसते आहे. सह्या साठवून ठेवणारे संग्राहक जॉब्सला अनेकदा सही देण्याबद्दल विनंती करत असत मात्र तो त्यासाठी कधीच होकार देत नसे. २०१८च्या पॉल फ्रेझरच्या कलेक्टिव्ह ओटोग्राफ इंडेक्स प्रमाणे स्टीव्हच्या सहीची किंमत ५० हजार डॉलर्स म्हणजे ३५ लाख रु. नोंदली गेली आहे. स्टीव्हच्या सहीला नेहमीच वाढती मागणी राहील असाही दावा केला जातो.

यापूर्वी स्टीव्ह जॉब्सची सही असलेले टॉय स्टोरीचे पोस्टर ३१२५० डॉलर्स म्हणजे २२,४०,००० रुपयात लिलावात विकले गेले आहे.

Leave a Comment