चौदा वर्षीय मुलाने केली सौर छत्रीची निर्मिती


मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील करमेडी गावामध्ये राहणारा रामकृष्ण अहिरवार आपल्या वडिलांच्या काळजीने बेचैन असे. त्याचे वडील शेतकरी असून, त्यांना दररोज घरातून शेतावर जावे लागत असे. घरापासून शेत काही अंतरावर असल्याने रामकृष्णाच्या वडिलांना हा प्रवास पायी करावा लागत असे. विशेषतः पावसाळ्यामध्ये हा पायी प्रवास रामकृष्णाच्या वडिलांसाठी भयंकर त्रासाचा होत असे. या त्रासापासून आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी रामकृष्णाने एक खास छत्री तयार केली. या छत्रीमुळे रामकृष्णाच्या वडिलांच्या सर्व समस्या दूर झाल्या. ह्या छ्त्रीमागची कल्पना इतकी विलक्षण होती, की या छत्रीने राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले. इतकेच नाही, तर ही छत्री बनविणाऱ्या रामकृष्णाला जपान एक्स्चेंज प्रोग्रॅम करता खास आमंत्रण आले आहे. हा एक्स्चेंज प्रोग्रॅम विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत होणार आहे.

रामकृष्णाच्या वडिलांना पावसातून पायी शेतावर जाताना एका हातात छत्री तर दुसऱ्या हातामध्ये टॉर्च पेलत मार्गक्रमण करावे लागत असे. ते पाहून रामकृष्णाने अशी छत्री विकसित केली, जी पावसापासून बचाव करतानाच, त्यामध्ये लावलेल्या दोन एलईडी दिव्यांमुळे चालत असताना वाटेवर पुरेसा प्रकाशही पुरवते. हे एलईडी दिवे सौर उर्जेवर चालतात. त्यामुळे अंधारामध्ये बाहेर पडायचे झाल्यास टॉर्च बरोबर नेण्याची गरज सरली. इतकेच नाही, तर या छत्रीमध्ये एक लहानसा म्युझिक प्लेअरही आहे. हा प्लेअरही सौर उर्जेवर चालतो. ओसाड माळरानावरून जात असताना काही जंगली जनावरांचा हल्ला होण्याचा धोका संभविल्यास त्या धोक्याची सूचना देणारा एक सायरनही या छत्रीमध्ये बसविण्यात आला आहे. पावसाळ्यांमध्ये उन्हाचा अभाव असल्याने छत्री चार्ज होण्यास अडचण होऊ नये या करिता विजेवर देखील ही छत्री चार्ज करण्याची सोय या छत्रीमध्ये करण्यात आली आहे.

ही आगळीवेगळी छत्री बनविण्याकरिता रामकृष्णाने घरामधील रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर केला. छत्रीचा चार्जिंग पॉइंट बनविण्याकरिता त्याने डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॅकेटमधील चार्जिंग उनिटचा वापर केला. छत्रीमध्ये वापरले गेलेले सोलर पॅनल्स सौर उर्जेवर चालणाऱ्या टॉर्च मधून मिळविले गेले.

Leave a Comment