पती-पत्नीमध्ये सोशल मीडियामुळे निर्माण होत आहे दुरावा


मुंबई : सध्याच्या घडीला सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असून सोशल मीडियामुळे होणारे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही या सोशल मीडियाचे जाळे पसरत चालले आहे. दरम्यान पोलिसांच्या अभ्यासात एक धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आजच्या परिस्थितीत आपण इतरांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक, व्हॉटस्अॅपसारख्या अॅपचा वापर करतो. या सारख्या समाजमाध्यमांमुळे अनोळखी व्यक्तीशी आपली मैत्री होते. त्याचबरोबर संवाद साधताना आपण किती मोठे आणि श्रीमंत असल्याचा बनाव देखील कित्येक वेळा केला जातो. अशा या बनावाला बहुतंशी विवाहित स्त्रिया बळी पडतात. त्यातच अनेक जोडपी ही एकमेकांना वेळ देण्याऐवजी सोशल मीडियाला जास्त वेळ देतात. पोलिसांच्या आकडेवाडीनुसार सोशल मीडियामुळे 35 ते 40 टक्के जोडप्यांमध्ये दुरावा असल्याचे वास्तव समोर आले आहे.

आपल्या विकासासाठी नवीन टेक्नॉलॉजी, नव नवे मोबाईल, कॉम्प्युटर-लॅपटॉप आहेत. आपल्याला जगाशी कनेक्ट ठेवण्यासाठी सोशल मीडिया देखील मदत करते. पण यामुळे आपली जवळची माणसे दुर जातात. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी. घरगुती वादाच्या अनेक प्रकरणांमध्ये हाच प्रकार आढळून आला आहे. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर जोडप्यांनी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. पण सध्याच्या घडीला जोडपी एकमेकांना वेळ देण्याऐवजी सोशल मीडियाला जास्त वेळ देतात.

यामुळेच घरात कायम वादाची परिस्थिती असते. पोलिसांच्या महिला समुपदेशन केंद्राकडे अनेक महिला कौटूंबिक वादाच्या तक्रारी येतात. त्यातील 50 टक्के प्रकरणे सोशल मीडियामुळे होत असलेल्या वादाची असल्याचे यात आढळून आले आहे. कौटूंबिक वाद सोडविण्यासाठी पोलिसांनी महिला समुपदेशन सेलची सुरुवात केली होती.

पूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नंपुसकता या सारखी कारणे दिली जायची. पण आता हायटेक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापरही घटस्फोटाच कारण ठरत आहे. इंटरनेट आल्यापासून जग जवळ आलं. पण जवळच्या गोष्टी तितक्याच लांब गेल्या हे आता स्पष्ट होत आहे.

Leave a Comment