घरातले प्रदूषण घातक


आपल्या देशात घराघरात मातीच्या चुली असतात आणि अजूनही लाखो कुटुंबांत या चुलीत झाडाची लाकडे तोडून ती सरपण म्हणून वापरली जातात. या लाकडांत थोडा जरी ओलसरपणा शिल्लक असेल तर त्यांचा धूर होतो आणि त्यावेळी घरात असणारे लोक खोकलायला लागतात. त्यांच्या श्‍वासातून धूर त्यांच्या घशात आणि तिथून फुफ्फुसात जातो. धूर होऊ नये म्हणून गृहिणी फुंकायला लागतात पण लाकडे लवकर पेट घेत नाहीत. दरम्यान तिच्या आता गेलेला धूर हा किमान ४० ते ५० सिगारेटींच्या धुराएवढा असतो आणि त्यातून अनेक प्रकारच्या श्‍वसनाच्या रोगांना प्रारंभ झालेला असतो. अशा घरातल्या या प्रदूषणाचे घरातल्या लहान मुलांवर होणारे परिणाम फार सखोल आणि दूरगामी असतात.

फुफ्फुसाची वाढ खुंटल्याने मुलाच्या शरीराचीही वाढ खुुुंटते आणि मुले खुरटी होतात. त्यांचे वय वाढते पण उंची दीड किंवा दोन फूटच राहते. भारतात अशा खुरटलेल्या मुलांची आणि मुलींची संख्या ६१ लाख असून त्यास घरातला हा धूरच कारणीभूत असतो असे संशोधनांती कळले आहे. महिलांना तर त्यातून अनेक प्रकारचे श्‍वासाचे विकार होतात. म्हणून केन्द्र सरकारने दारिद्य्र रेषेखालच्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन द्यायला सुरूवात केली आहे. सरकारने अशा पाच लाख गॅस शेगड्या वाटण्याचे ठरवले असले तरीही अजून लाखो कुटुंबात लाकडांचेच इंधन वापरले जाते. जगातले प्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकारे आणि अनेक संस्था काम करीत आहेत पण त्यांचा भर घराबाहेरच्या प्रदूषणावर आहे.

त्यांनी घरातल्याही प्रदूषणाचा विचार केला पाहिजे असे काही तज्ज्ञांना वाटते कारण घरातल्या प्रदूषणामुळे जगात दरसाल चार कोटी ३ लाख लोक मरत असतात. भारतातही कुटुंब पाहणीत असेचआढळून आले आहे. भारतात दरसाल अनेक मुले खुरटत चालली आहेत. त्यांच्या खुरटण्याचा संबंध घरात वापरल्या जाणार्‍या इंधनाशी आहे. ज्या घरात गॅस आहे त्या घरात अशा खुरटलेली मुले नसतात पण ज्या घरात लाकडाचे इंंधन वापरले जाते त्याच घरांत अशी मुले आढळतात. २००५-२००६ साली करण्यात आलेल्या पाहणीत हे दिसून आले आहे. खुरटलेल्या मुलांच्या केवळ शरीराचीच वाढ खुंटलेली असते असे नाही तर मन आणि बुद्धीचीही वाढ थांबलेली असते. अशी मुले शिक्षणात मंदही असतात आणि फारशी प्रगती करू शकत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment