पोलिसांनी त्या आरोपींना गोळ्या स्वरक्षणाखातर घातल्या


हैदराबाद – सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी पोलिसांवर हल्ला करत आरोपींनी बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्यामुळे पोलिसांनी स्वरक्षणाखातर गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. दोन पोलीस कर्मचारी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच त्यांनी यावेळी आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवणार असल्याचे सांगितले.

आम्ही चार आरोपींना खूप तपासाअंती अटक केली होती. त्यांना ३० तारखेला अटक केली होती. आम्हाला ४ तारखेला आरोपींची कस्टडी मिळाली. गुन्हा कसा झाला याची चौकशी यावेळी सुरु केली. त्यांनी यावेळी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्थळी लपवल्याचे सांगितले. पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या बंदुका यावेळी त्यांनी हिसकावून घेतल्या. त्यांना आमच्या अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले. फायरिंग करण्यास त्यांनी सुरुवात केल्यानंतर पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, त्यातच त्या चौघांचा मृत्यु झाल्याची माहिती व्ही सी सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अशाच प्रकारचे गुन्हे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्येही आरोपींनी केल्याची शक्यता त्यादृष्टीने तपास करत आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचे यावेळी व्ही सी सज्जनार यांनी स्पष्ट केले. आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Leave a Comment