हैदराबाद एनकाऊंटरचे समर्थन करणार नाही – उज्ज्वल निकम


जळगाव – हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडातील पीडितेला झटपट न्याय मिळाला, सर्वसामान्य नागरिक या भावनेतून हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनेमुळे खूश झाला आहे. माझी देखील सर्वसामान्य नागरिक म्हणून हीच भावना आहे. पण मी या घटनेचे कायद्याचा अभ्यासक म्हणून समर्थन करणार नसल्याचे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

चार नराधमांनी ‘हैदराबाद येथे एका पशुवैद्यक डॉक्टर महिलेवर अमानुष अत्याचार करत तिची जिवंत जाळून हत्या केली होती. ही संतापजनक घटना मागील आठवड्यात घडली होती. आज पहाटे हैदराबाद पोलिसांनी या घटनेतील चारही आरोपींचे एन्काऊंटर केले. कायद्याच्या बाजूने विचार केला तर घडलेली घटना ही चुकीची असल्याचे माझे स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे.

सर्वसामान्य माणूस आज पीडितेला न्याय मिळाला या भावनेतून आनंदी आहे. पण, या घटनेमुळे शासन आणि न्यायपालिकेने अंतर्मुख होण्याची गरज असून कायद्याचा अभ्यासक म्हणून मी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थन करणार नाही. कारण हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ज्या परिस्थितीत पोलिसांनी त्याठिकाणी गोळीबार केला आणि तेथील परिस्थिती पाहता ती गोळीबार करण्यासारखी नसल्याचे माझे स्पष्ट मत आहे.

Leave a Comment