यापुढे नो बॉलचा निर्णय देणार थर्ड अम्पायर


दुबई – हैदराबाद येथे आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत असून या दरम्यान मालिकेत गोलंदाजाचा पाय क्रीझबाहेर पडल्यामुळे देण्यात येणारा नोबॉल मैदानातील अम्पायरकडून नव्हे तर थर्ड अम्पायरकडून दिला जाणार आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला आहे. हा प्रयोग या मालिकेत करून पाहिला जाणार असून त्यात यश आल्यास ही पद्धत भविष्यात उपयोगात आणायची अथवा नाही याचा विचार केला जाईल.

तीन टी-२० सामने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत होणार असून तेवढेच एकदिवसीय सामने होणार आहेत. आजपासून या मालिकेला प्रारंभ होत आहे. हे तंत्र या मालिकेत प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे. यासंदर्भात आयसीसीने पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयसीसी पत्रकात म्हणते की, थर्ड अम्पायरचे या संपूर्ण सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर लक्ष असेल. क्रीझमध्ये त्याचा पाय आहे की बाहेर हे पाहण्याची जबाबदारी थर्ड अम्पायरची असेल. त्यांना जर नोबॉल असल्याचे वाटले तर ते मैदानावरील पंचांशी संपर्क साधतील आणि मैदानावरील पंच नोबॉल जाहीर करेल. एकंदरीतच मैदानावरील पंच नोबॉलची घोषणा स्वतःहून करणार नाही. थर्ड अम्पायरशी त्यांना सल्लामसलत करावी लागेल.

एखाद्या निर्णयाच्या बाबतीत जर संशयाचा फायदा द्यावा लागला तर तो गोलंदाजालाच दिला जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीने असेही म्हटले आहे की, नोबॉलच्या निर्णयाला जर उशीर झाला मैदानावरील पंच तर आपला निर्णय बदलून नोबॉल जाहीर करतील. या नव्या पद्धतीमुळे नोबॉलच्या अचूक निर्णयात वाढ होते आहे का त्याशिवाय, खेळाची लय कायम ठेवत या नव्या पद्धतीचा अवलंब करता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे.

Leave a Comment