फ्लॅट फूटवेअर


उंच टाचांच्या चपलांपेक्षा फ्लॅट चप्पल निश्‍चितच आरामदायी असतात. योग्य पेहरावावर योग्य फ्लॅट चप्पल वापरल्यास चांगला लुक मिळू शकतो. उंट टाचेच्या किंवा बेली फूटवेअरला अधिक मागणी असली तरीही अलीकडील काळात प्रत्येक मुलीकडे एकतरी फ्लॅट फूटवेअर असतेच. कारण फ्लॅट फूटवेअर सहजपणे वापरता येते. सध्या फ्लॅट फूटवेअरमध्येही नवी डिझाइन्स पाहायला मिळतात. अर्थात पोशाख आणि पादत्राणे यांची योग्य सांगड घालूनच त्यांची निवड करावी.

लोफर्स – सध्याच्या मोसमात गडद किंवा फिक्‍या रंगातील लोफर्स वापरू शकता. अर्थात पोशाखाला साजेसे आहेत की नाही याचा विचार जरूर करावा. ट्राउझर्स, लांब स्कर्ट असेल, तर त्यावर लोफर्स घालता येऊ शकतात; पण जर लोफर्सचा तळ जड असेल तर मात्र फक्त स्कर्टबरोबरच ते वापरा.

राऊंड टो – सध्या बाजारात विविध डिझाइन, प्रकारातील राउंड टो गोलाकार टाच असलेले फ्लॅट फूटवेअर उपलब्ध आहेत. पुढून दिसायला छोटे असल्याने ते लहान पावलांना मोठे भासवते. साध्या पॅंटबरोबर घातल्यास ते नक्कीच स्टाईलिश दिसतील. जास्त किंवा कमी उंचीची पॅंट, जीन्स, स्कर्ट यांच्यावरही राउंड टो फ्लॅट चांगल्या दिसतील.

पॉइंटेड – स्कर्टबरोबर पॉइंटेड फ्लॅट्‌स वापरता येतात. स्ट्रेट फिटिंग जीन्स किंवा घोट्यापर्यंत लांब पॅंटवरही हे घातले जाऊ शकतात; परंतु अगदी स्कीन टाइट जीन्सबरोबर पॉइंटेड फ्लॅट्‌स घालण्याची चूक करू नका.

स्ट्रेपी – स्ट्रेपी फ्लॅट्‌स ऑफिसवेअर म्हणून नक्कीच योग्य दिसतील. त्यामुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसेल. सर्वसाधारणपणे पाश्‍चिमात्य पोशाखांवरच स्ट्रेपी फ्लॅट्‌स वापरले जातात. भारतीय आणि पाश्‍चिमात्य दोन्ही प्रकारच्या पोशाखावर ते घातले जातात.

काय काळजी घ्याल?…
* फ्लॅट फूटवेअर घेताना योग्य आकाराचे निवडायला हवे. तसेच गुणवत्ताही तपासून घ्यावी. कमी गुणवत्तेचे फ्लॅट फूटवेअर पायांसाठी अपायकारक ठरू शकतात.
* फ्लॅट फूटवेअर खरेदी करताना दुकानात ते घालून पाहा आणि थोडे चालूनही पाहावे. त्यामुळे ही पादत्राणे आरामदायी आहेत की नाही हे लक्षात येईल.
* फ्लॅट फूटवेअर घेताना प्लॅस्टिकपासून बनवलेली पादत्राणे घेऊ नयेत.

Leave a Comment