केसांचे आरोग्य

हेल्थ कॉन्शस पण ज्ञान मात्र जाहिरातीतून मिळविलेले अशा विचित्र परिस्थितीला आपण सध्या सामोरे जात आहोत. जगन्मान्य असलेली ’ फॅमिली डॉक्टर ’ ही संकल्पनाही आता जवळजवळ अस्तित्व हरवून बसलेली. अशावेळी किरकोळ आजारासाठी अथवा कांही आरोग्यदायी सल्ल्यांसाठी कांही माहिती लागली तर ती कुठे मिळवायची असा प्रश्न येतो.

फार पूर्वीपासून भारतीय संस्कृतीत किरकोळ आजारांसाठी आजीबाईचा बटवा महत्त्वाचे स्थान मिळवून होता. आता आजीच घरात असणे अवघड तर बटवा कुठून मिळायचा ? पण आजही अगदी घरातच असणार्‍या साध्यासाध्या पदार्थांपासून किरकोळ उपचार कसे करायचे याचे मार्गदर्शन देण्याचा हा प्रयत्न. यातील उपचार प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य श्रीकांत बागेवाडीकर यांना विचारून घेतले आहेत.

केस हा सार्‍यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. केसांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारची ओळख मिळत असते. विशेषतः महिला वर्गाला ही ओळख जास्त महत्त्वाची असते. केस कुणाच्याही सौंदर्यात कशी भर घालतात हे कांही सांगायला नको.मात्र या केसांची निगा आणि कांही तक्रारी असल्यास त्या दूर करणे हे मोठे कामच होऊन बसते. अशा वेळी हे छोटे छोटे उपाय नक्कीच फायद्याचे ठरतात. चटकन करता येणारे हे उपाय करून पाहावेत असेच आहेत.

१. केस पांढरे होणे – १०० ग्र्रँम खोबरेल तेलात २० ते २५ लाल जास्वंदीची फुले मंद आचेवर तळून काढावीत. पाण्याचा अंश गेला की फुलांसकट तेल गार होउ द्यावे व मग गाळून बाटलीत भरावे. हे तेल आठवडयातून किमान दोन वेळा केसांना लावावे.जास्वंद हा उत्तम नैसर्गिक डाय असून त्याचे इंग्रजी नाव ‘शू फ्लॉवर ’ असे आहे. पूर्वीव्या काळी ही फुले बुटांना पॉलिश करण्यासाठी वापरली जात असत.

२. केस गळणे-आजकाल अगदी शालेय विद्याथ्यांपासून सर्वांनाच ही समस्या भेडसावते आहे. हवेतील प्रदूषण, शांपूचा अतिरिक्त वापर, आहारातील त्रुटी ही त्या मागची मुख्य कारणे असू शकतात. संत्रे अननसाचा रस रोज १ ग्लास या प्रमाणे १५ दिवस प्यायला असता केस गळती कमी होते.
 
३. चाई लागणे- हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे पण त्यावर १०० टक्के खात्रीने औषधोपचारच्या साहय्याने इलाज करता  येतो.

४. केसांची टोके दुभंगणे- केसांची टोके बरेचवेळा दुभंगलेली आढळतात. अशावेळी ही टोके थोडी कापावीत. डोक्याला केसांच्या मुळाशी आठवड्यातून किमान एकदा खोबरेल अथवा माका किवा आवळेल तेलाचा मसाज करून अर्धा तासानंतर केस धुवावेत. केस वाळवताना ड्रायरचा वापर शक्यतो करू नये. कोरड्या पंचाने केस पुसावेत. अगदीच घाई असेल तरच ड्रायर वापरावा.

केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारातही कांही बदल करावे लागतात. दिवसातून किमान एकदा तरी तीळ अर्धा किवा एक चमचा चावून खावेत. आयुर्वेदानुसार केस हा अस्थि धातूचा मल आहे. अस्थिधातूच्या पोषणासाठी तीळ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तीळाचे सेवन केसांच्या आरोग्यसाठीही उपयुक्त ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “केसांचे आरोग्य”

  1. चाईच्या समस्येने मी 12 वर्ष हैराण झालो आहे.भरपूर डोक्तर झाले.पण फरक काही नाही आणि पाया पासून ते डोक्या पर्यंत शरीरावर बऱ्याच ठिकाणी चाईच्या छोटे छोटे स्पॉट आले आहेत त्यावर खात्रीशीर उपाय सांगा

Leave a Comment