बलात्काऱ्यांना महिलांनी पूर्णपणे सहकार्य करायला हवे – डॅनियल श्रवण


सध्या देशभरात हैदराबादमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाचे पडसाद उमटत आहेत. समाजाच्या सगळ्याच स्तरातून मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध होत असताना अत्यंत खळबळजनक आणि असंवेदनशील वक्तव्य एका दाक्षिणात्य निर्मात्याने केले आहे. या निर्मात्याचे नाव डॅनियल श्रवण असे असून बलात्कारानंतर पीडित तरुणीची हत्या होऊ नये म्हणून देशात बलात्कार कायदेशीर करण्यात यावा, असे संतापजनक तर्कट त्याने मांडले आहे.

निर्माता डॅनियल श्रवण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने याबाबत एक लांबलचक फेसबुक पोस्ट लिहून स्वत:च्या या मताचे समर्थनही केले आहे. बलात्कारानंतर पीडित तरुणीची हत्या होऊ नये म्हणून सरकारकडून देशात बलात्कार कायदेशीर करण्यात यावा. बलात्काराविषयी योग्य ते शिक्षण वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक मुलीला दिले गेले पाहिजे. ज्यामुळे पुरुषांच्या कामवासना मुली नाकारणार नाहीत. त्यांच्या कामवासना पूर्ण झाल्या तर ते मुलींना मारून टाकणार नाहीत. त्याचबरोबर सरंक्षणासाठी १८ वर्षांवरील सगळ्याच मुलींना स्वत:सोबत कंडोम आणि दातांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे डेंटल फ्लॉस ठेवावा. त्या बलात्कार झाल्यावर या दोन्ही गोष्टींचा वापर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी करू शकतात. पण त्यांनी त्यावेळी बलात्कार करणाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. बलात्काऱ्याची लैंगिक वासना पूर्ण झाल्यावर तो महिलेला जीवे मारणार नाही, असे लाजवणारे वक्तव्य त्याने केले आहे.

‘रेप विदाऊट व्हायलन्स स्किम’ ही नवी योजना आणण्याचा अनाहूत सल्लादेखील डॅनियल श्रवणने सरकारला दिला आहे. जर पुरुषाची लैंगिक वासना बलात्कारादरम्यान पूर्ण होत नसल्यामुळेच महिलांच्या हत्या होतात. पीडित महिला, मुलींनी जर बलात्कार करणाऱ्याची ही इच्छा पूर्ण केली तर अशा घटना घडणार नाही. बलात्कार थांबवण्यापेक्षा त्यानंतर होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. विरप्पनला मारल्यानंतर तस्करी थांबली नाही किंवा लादेनचा खात्मा केल्याने जगातून दहशतवादाचा प्रश्न सुटला नाही. तसेच या पीडितांची हत्या केल्याने बलात्काराचा प्रश्न सुटणार नाही. सरकार निर्भया अॅक्ट, पेपर स्प्रे अशा गोष्टींनी बलात्कार करणाऱ्यांना अधिक घाबरवायचा प्रयत्न करत आहे. पण बलात्कार करणाऱ्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण होत नाहीत हे समजून घेण्यास ते तयार नाहीत. याच ताणातून ते पीडित मुलींची, महिलांची हत्या करत असल्यामुळे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी महिलांना पुरुषांच्या लैगिंक वासना वेळोवेळी पूर्ण केल्या पाहिजेत, असे देखील डॅनियल श्रवणने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियावर त्याची ही फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. अनेकांनी डॅनियल श्रवण विकृत असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान डॅनियल श्रवणने आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून ही पोस्ट हटवली असली तरी त्याचे स्क्रिन शॉट मात्र त्यापूर्वीच व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment