भाजपला गळती; 12 आमदारांसह हे खासदार सोडणार पक्ष ?


मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीहीन करण्यासाठी पक्षात मेगाभरती केली. पण याच मेगाभरतीचे भाजपवर आता बुमरँग होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे 12 विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर मोठी राजकीय उलथापालथ घडली. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पक्षांतर करून फसलेले आमदार पुन्हा आता सत्ताधारी असणाऱ्या तीन पक्षांच्या संपर्कात आहेत. या संदर्भातील वृत्त ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ दिले आहे.

पक्ष सोडण्याच्या तयारीत भाजपचे जे आमदार असल्याचे म्हटलं जात आहे त्यामध्ये मराठवाड्यातील 3, पश्चिम महाराष्ट्रातील 5 आमदारांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेच्या संपर्कात आणखी 4 आमदार असल्याची चर्चा आहे. स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला जाण्याचीही या आमदारांची तयारी असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी निर्णय घेतलेला नाही.

भाजपच्या 12 आमदारांसह एक राज्यसभा खासदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हा खासदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भाजपचा नेमका हा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या 7 आमदारांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोन केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. या आमदारांनीही आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याचे देखील वृत्त आहे. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

Leave a Comment