तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची खोटी लग्न लावून चीनमध्ये विक्री


नवी दिल्ली – आजवर आम्ही तुम्हाला पाकिस्तानमधील मुलींची चीनमध्ये होणारी विक्री याबद्दल अनेकदा सांगितले आहे. पण याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 629 पाकिस्तानी मुलींना नववधू बनवून त्यांची 2018 पासून आतापर्यंत चीनमध्ये विक्री केली गेली आहे. क्लब, बार अशा ठिकाणी या मुलींना पुढे वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात आहे. पाकिस्तानची चीनशी असलेल्या जवळकीमुळे मुलींच्या तस्करीत गुंतलेले नेटवर्क उधळून लावण्यासाठी काहीही करू शकत नाही, पण या 629 मुलींसह अनेकींचे आयुष्य त्यामुळे धोक्यात आले आहे.

मुलींची खरेदी-विक्री करण्यासाठी फार मोठे नेटवर्क कार्यरत आहे. पाकिस्तानी तपास यंत्रणा या नेटवर्कला शोधून त्यांचे कार्य हाणून पडण्यास मदत करत आहेत. पण ते फेडरल सरकारच्या दबावामुळे प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. जे लोक या नेटवर्कमध्ये सामील आहेत त्यांच्यावर कारवाई केल्यास, चीनसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध दुखावले जाऊ शकतील अशी भीती पाकिस्तान सरकारला आहे. चीनने आपला मित्रदेश पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. परिणामी, मानवी तस्करीत अडकलेल्या 31 चिनी नागरिकांना, ऑक्टोबर महिन्यात फैसलाबाद येथील न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती देणाऱ्या अनेक स्त्रियांना सुरुवातीला धमकावण्यात आले. तसेच त्यांचे तोंड पैशाचा वापर करून बंद करण्यात आल्यामुळे त्यांनी वेळ आल्यावर खरी माहिती सांगण्यास नकार दिला. वधूसाठी चीनच्या नागरिकांकडून मुलींच्या तस्करीमध्ये सामील असलेले चिनी आणि पाकिस्तानी तस्कर 65 हजार डॉलर्स (सुमारे 45 लाख रुपये) पर्यंत शुल्क आकारतात. पण एक लाखापर्यंतच रक्कम मुलीच्या कुटूंबाला दिली जाते. 91 हजार चिनी तरुणांना 2013 ते 2017 या काळात पाकिस्तानचा व्हिसा दिला गेला आहे. 750 ते 1000 पाकिस्तानी मुलींनी मागच्या दोन वर्षांत चिनी मुलांशी लग्न केली आहेत.

Leave a Comment