वेगवान धावपटू ब्लॅकची आयपीएल खेळण्याची इच्छा


जमैकाचा २९ वर्षीय वेगवान धावपटू योहान ब्लॅक याने दोन वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत खेळायला आवडेल असे जाहीर केले. तो मुंबईत रोड सेफ्टी वर्ल्ड टी २० सिरीजच्या प्रमोशन साठी आला असून पुढच्या फेब्रुवारीत हे सामने खेळले जाणार आहेत. त्यात सचिन तेंडूलकर, लारा सारखे महारथी खेळणार आहेत. धावपटू म्हणून निवृत्ती घेतल्यावर आपल्याला क्रिकेट खेळणे आवडेल असे सांगून तो म्हणाला मी वेस्ट इंडीज कडून खेळण्यापेक्षा आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळणे पसंत करेन. कदाचित एखादी फ्रँचाईसी घेईन. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर बंगलोर या त्याच्या आवडत्या टीम असल्याचेही त्याने सांगितले.

योहान म्हणाला, सध्या तरी मी क्रिकेट स्पर्धेत नाही कारण माझे सगळे लक्ष आगामी ऑलिम्पिकवर आहे आणि मी अॅथलीट आहे. १०० व २०० मीटर स्पर्धात त्याने दोन ऑलिम्पिक गोल्ड तर दोन सिल्वर पदके मिळविली आहेत. तो म्हणाला हे क्षेत्र अवघड आहे त्यामुळे माझ्या मुलांनी धावपटू होण्यापेक्षा क्रिकेटर बनावे असे वाटते. तो म्हणाला माझ्या करियरची अजून दोन वर्षे आहेत. त्यानंतर मी क्रिकेट खेळेन. सुरवातीला तो क्रिकेट खेळतच होता आणि तो चांगला वेगवान गोलंदाज आहे. करियरचा निर्णय घेताना मात्र त्याने जगातील सर्वोत्तम धावपटू होण्यास प्राधान्य दिले. विराट आणि डिव्हीलियर त्याचे आवडते खेळाडू असले तरी लहानपणापासून तो सचिनचा चाहता आहे.

आगामी काळात सचिनला बोलिंग करायला आवडेल आणि मी वेगवान गोलंदाज असल्याचे त्याची विकेट घेऊ शकेन असेही योहानने सांगितले.

Leave a Comment