असे दिसते किम जोंगने वसविलेले नवे शहर


उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने उंच पर्वत रांगात वसविलेल्या नव्या शहराचे उद्घाटन नुकतेच लाल फित कापून केले असून या शहराशी त्याच्या कुटुंबाची नाळ जोडली गेली असल्याचे सांगितले जाते. किमच्या वडिलांचे हे ठिकाण जन्मस्थळ असुन येथे नव्याने वसविलेले हे शहर आधुनिक सभ्यतेचे प्रतिक असल्याचे किमने जाहीर केले आहे.


कोरियात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या माउंट पाएक्तू जवळ हे शहर आहे. या शहराचे नाव सामजिऑन असे ठेवले गेले असून या शहरात ४ हजार कुटुंबे राहू शकणार आहेत. शहराच्या उद्घाटनाच्या वेळी आतषबाजी केली गेली. येथे इमारती, हॉटेल्स, स्की रिसोर्ट, कमर्शियल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा, हॉस्पिटल अश्या सुविधा आहेत. काही दिवसापूर्वी किम जोंग उन या भागात पांढऱ्या घोड्यावरून रपेट करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले होते तेव्हा काही मोठी घोषणा करण्यापूर्वी किम येथे येतो असे सांगितले गेले होते. मात्र त्यावेळी ही घोषणा अणुबंदी संदर्भात असेल असा कयास वर्तविला गेला होता.

अमेरिकेने उत्तर कोरियावर अण्वस्त्रे संदर्भात अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे या नव्या शहराच्या उभारणीला जादा वेळ लागल्याचे सांगितले जात आहे. मानवाधिकार संस्थांशी जोडलेल्या लोकांनी मात्र हे शहर म्हणजे मजूर गड असल्याची टीका केली आहे. किम सरकार देशातील युवकांना लष्कराप्रमाणे १२-१२ तास मजुरीला जुंपते आणि त्याची मजुरी दिली जात नाही इतकेच नव्हे तर त्यांना खाण्यापिण्याची सुविधाही दिली जात नाही असा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

Leave a Comment