अजित, फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची कल्पना होती- शरद पवार


अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची कल्पना मला होती मात्र त्यासाठी कॉंग्रेस कारणीभूत आहे असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर शरद पवार यांनी अनेक खुलासे केले असून त्यात मोदींकडून ऑफर आली पण ती मी नाकारली असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले, सुरवातीला शिवसेना आणि भाजप यांचे सरकार स्थापनेवरून चाललेले वादविवाद पाहता आम्ही आणि कॉंग्रेसने सरकार स्थापनेचा विचार सुरु केला होता. मात्र त्यावेळी दीर्घकाळ बैठका चर्चा होऊनही वादावादी थांबत नव्हती. त्यामुळे अजित पवारांना हे सरकार स्थापन होईल आणि झाले तरी चालेल याची खात्री वाटेना तेव्हा त्यांनी भाजपशी संपर्क साधल्याचे मला माहिती होते. मात्र एकदम ते फडणवीस यांच्याही हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे मला वाटले नव्हते. अजित जेव्हा भाजपच्या संपर्कात होते तेव्हा शिवसेना आमच्याबरोबर चर्चेत नव्हती असेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांनी हे पाउल उचलले त्याला कॉंग्रेस जबाबदार आहे असे सांगून शरद पवार म्हणाले, सकाळी उठल्यावरच मला अजितने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजले तेव्हा मी तातडीने सूत्रे हाती घेऊन सर्व आमदारांना परत आणले. राष्ट्रवादीला कॉंग्रेस पेक्षा १० जागा जास्त आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले, कॉंग्रेसला स्पीकरपद मिळाले, राष्ट्रवादीला काय मिळाले असा सवाल करून पवार म्हणाले उपमुख्यमंत्र्याला काही अधिकार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. यातून भविष्यात उद्धव यांच्यासाठी राष्ट्रवादी मध्ये संतुलन राखणे अवघड कामगिरी असल्याचे संकेत दिले गेल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.