ट्रम्प यांनी केला पदाचा गैरवापर, महाभियोगाच्या चौकशीत दोषी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग सुनावणीत हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसच्या तपास समितीमध्ये ते दोषी आढळले आहेत. तपास समितीने आज महाभियोग तपासाचा अंतिम अहवाल सादर केला. यामध्ये ट्रम्प यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे समोर आले आहे.

अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी खाजगी व राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या पदाचा वापर करत 2020 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी युक्रेन देशाकडून मदत मागितली.

तपास समितीचे सदस्य म्हणाले की, ट्रम्प यांनी राष्ट्रपती निवडणुकीच अखंडता कमकुवत केली आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या पदाच्या शपथीचे देखील उल्लंघन केले आहे.

असे असले तरी व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी स्टीफनी ग्रीशम यांनी हा अहवाल फेटाळला आहे. त्या म्हणाल्या की, ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे काहीही पुरावे नाहीत. समिती ट्रम्प यांच्याविरोधात साक्ष उपलब्ध करण्यास असक्षम ठरली. या अहवालात केवळ द्वेष दिसत आहे.

पुढे काय होईल ?

हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसमध्ये सुनावणी पुर्ण झाल्यावर सदनात मतदान होईल. मतदानात ट्रम्प यांच्या विरोधात बहुमत आल्यास प्रकरण सिनेटमध्ये जाईल. सिनेटमध्ये यावर मतदान होईल. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत आहे. त्यामुळे महाभियोगाची प्रक्रिया शक्य नाही.

ट्रम्प यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडाइमर जेलेंस्की यांच्यावर डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बायडेन आणि त्यांच्या मुलाच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दबाव टाकला. एका व्हिसलब्लोअरने (गुप्त माहिती देणारी व्यक्ती) या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. असे असले तरी ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ते जेलेंस्की यांच्याबरोबर झालेल्या फोनवरील चर्चेचे स्पष्टीकरण देण्यास तयार आहेत.

Leave a Comment