गढीमाई मेळ्यात ३० हजार पशूंचा बळी


देवापुढे बळी देण्याची परंपरा जुनी असली तरी आजकाल न्यायालयांनी अश्या प्रथांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही काही देशात परंपरा धर्माच्या नावावर आजही प्रत्येक समुदाय पशु बळी देताना दिसतो. नेपाळ येथे दर पाच वर्षांनी भरणारी गढीमाई देवीची यात्रा यंदा मंगळवार बुधवार अश्या दोन दिवशी साजरी होत असून यंदा येथे ३० हजाराहून अधिक पशु बळी दिले जात आहेत. मंदिर परिसरात हे बळी दिले जात असून या यात्रेसाठी नेपाळ बरोबरच भारतातूनही हजारोंच्या संख्येने भाविक जमले आहेत.


काठमांडूपासून १०० किमीवर बैरायापूर येथे हे मंदिर असून तेथे दर पाच वर्षांनी यात्रा भरते. मागील यात्रेत अन्य पशुंसह १० हजार रेड्यांचा बळी दिला गेला होता.नेपाळ न्यायालयाने असे बळी देण्यावर बंदी घातली असली तरी यंदाही हजारो पशु बळी दिले जात आहेत. गढीमाई ही शक्तीदेवता मानली जाते आणि तिच्या सन्मानार्थ हे बळी दिले जातात.या यात्रेदरम्यान हे जगातील सर्वात मोठे पशु हत्त्या केंद्र बनते आणि येथे पत्रकार तसेच जनतेला फोटो काढण्यास बंदी केली जाते असे हिमालयन पोस्ट या वृतपत्रात म्हटले गेले आहे.

यंदा मंगळवारी रेडे बळी देण्याचा शुभ दिवस होता तर बुधवारी कबुतरे, उंदीर, बदके, डुकरे यांचे बळी दिले जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment