मुख्यमंत्र्यांच्या बैठकींमध्ये ‘या’ आमदाराची वारंवार उपस्थिती वादात


मुंबई : लवकरच परदेशातील ‘सिॲम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय मुंबईत उभे राहण्याची शक्यता असून पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून या बैठकीबद्दल ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या बाजुच्या खुर्चीवर या फोटोंमध्ये आदित्य ठाकरेही दिसत आहेत. त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सचिवस्तरीय बैठकीत आमदार आदित्य ठाकरेंची वारंवार उपस्थिती या वादाचा मुख्य विषय आहे.


बँकॉक येथील ‘सिॲम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पर्यटन विभागाला दिल्याचे ट्विट माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

प्रोटोकॉलनुसार एखाद्या आमदाराला एखाद्या विषयाबद्दल काही सूचना सुचवल्या असतील किंवा मागणी केली असेल तर त्या आमदारांना बैठकांना बोलावले जाते. युवासेना सचिव वरुण सरदेसाईही या बैठकीसाठी आदित्य ठाकरे यांच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. युवा सेनेचे पदाधिकारी या बैठकीला त्यांच्यासोबत हजर होते.

सध्या मंत्रालयातही याबद्दल कुजबूज सुरू असलेली दिसून येत आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असलेले दिसतात. आदित्य ठाकरे हे आमदार असून मंत्री नाही. मग ते मुख्यमंत्र्यांसोबत सचिवस्तरीय बैठकीत सहभागी होऊ शकतात का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Leave a Comment