निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यासाठी मिळेना ‘जल्लाद’


नवी दिल्ली – हैदराबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. देशभरातील विविध भागांमध्ये पीडितेला न्याय मिळावा यासाठी मोर्चे काढले जात आहेत. सोमवारी संसदेमध्ये देखील हैदराबादच्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद पडले. या घटनेवर संसदेत खासदार जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बलात्काराबाबत देशात कडक कायदा असतानाही अशा घटना वारंवार वाचायला, ऐकायला मिळत आहेत. बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला मॉबलिचिंग अंतर्गत ठेचून काढायला हवे, असे जया बच्चन म्हणाल्या.

बलात्काराविरोधात देशभरात रान पेटलेले असताना निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाकडे जल्लाद नसल्याची माहिती समोर येत आहे. केव्हाही फाशीची शिक्षा निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना दिली जाऊ शकते. त्यांना लवकरच तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पण तिहार जेलमध्ये गुन्हेगारांना फाशी देणाऱ्या जल्लादची जागा रिक्त असल्यामुळे या नराधमांना कोण फासावर लटकवणार? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

तिहार जेल प्रशासन या नराधमांना फाशी देण्यासाठी वेगळे असे नियोजन करत असून पुढच्या महिन्यात निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींवर ब्लॅक वॉरंट न्यायालयाने जारी केल्यानंतर त्या आरोपींना कोणत्याही क्षणी फाशी होऊ शकते. दरम्यान, राष्ट्रपतींकडे या आरोपींनी दयेची याचिका पाठवली आहे. ही दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली तर तात्काळ त्यांच्या फाशीची तारीख घोषित केली जाईल.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोणत्याही क्षणी फाशीची शिक्षा होऊ शकते. त्याची तारीख लवकरच जाहिर होऊ शकते. पण या नराधमांना फाशी देणारा कर्मचारीच तिहार जेलमध्ये नसल्यामुळे या नराधमांना फाशी देण्यासाठी जेल प्रशासन कंत्राटीवर कर्मचारी ठेवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Leave a Comment