शंभर वर्षे टिकाऊ घर बनणार केवळ ७२ तासात


नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपिंग कौन्सिल तर्फे मजबूत, वजनाला हलकी, दीर्घकाळ टिकणारी आणि इको फ्रेंडली घरे झटपट बांधण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित केले गेले असून ही घरे अवघ्या ७२ तासात बांधता येणार आहेत. यामुळे घरबांधणीचा कालावधी कमी होईलच पण पारंपारिक घरांच्या तुलनेत वजनाला हलकी आणि तरीही १०० वर्षे टिकू शकतील अशी घरे सर्वसामान्य लोकांना सहज परवडतील. या घरांसाठी पक्क्या विटा किंवा नदीतून वाळू उपसा करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपिंग कौन्सिल कर्नाटक विभागाचे अध्यक्ष एम. सतीशकुमार यांनी या संदर्भात द न्यू इंडिअन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. त्यानुसार उत्तर कर्नाटकात नदीला आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे नष्ट झाली त्यांना ती पुन्हा बांधून देणे हे मोठे आव्हान होते त्यामुळे झटपट तरीही मजबूत घरे बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक ठरले होते. या तंत्रज्ञाच्या सहाय्याने २०१७-१८ मध्ये ६० दिवसात ७० हॉस्पिटल बांधली गेली. आता घरे बांधली जाणार आहेत.

यासाठी हलक्या स्टीलचा वापर केला जाणार असून ही घरे ऑनसाईट असेम्बल करता येतात. ती १०० वर्षे टिकू शकतात आणि कोणत्याही हवामान आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकतात. यात सुरक्षेचे सर्व मापदंड राखले गेले आहेत. पारंपारिक घरांच्या तुलनेत या घरांसाठी २० टक्के सिमेंट वापरले जाते शिवाय नदीतील वाळू अथवा पक्क्या विटांची गरज राहत नाही. या घरांचे वजन पारंपरिक घरांच्या तुलनेत एक दशांश इतकेच आहे. २०५०० चौरस फुटांचे घर या पद्धतीने काही आठवड्यात बांधून पूर्ण होते असे सतीश कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment