या गावात कांदा खरेदीलाच आहे बंदी


सध्या देशभर कांद्याच्या वाढलेल्या दरांची चर्चा सुरु असून अनेक राज्यात त्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. कुठे आधारकार्ड गहाण ठेऊन कांदा विकला जात आहे तर कुठे कुठे कांदा चोऱ्यांना उत आला आहे. कांद्याने १३० रुपये किलोची पातळी गाठल्याने सर्वसामान्यच नव्हे तर मध्यमवर्गीय माणसांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. मात्र बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील चिरी पंचायतीत येणारे त्रिलोकी बिघा या गावाला मात्र कांदा दरवाढीशी काहीही देणे घेणे नाही. कांद्याचे दर वाढले काय किंवा कोसळले काय या गावातील रहिवाश्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. याचे कारण म्हणजे ३०-३५ घरे असलेल्या या गावात कांदा लसूण खाल्लाच जात नाही.

बिहार राजधानी पटना मध्ये कांदा १०० रुपये किलोवर गेला आहे. अन्य भागात कांदा दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र त्रिलोकी बिघा रहिवासी त्यापासून अलिप्त आहेत. या गावात प्रामुख्याने यादव लोक आहेत. त्यातील ज्येष्ठ सांगतात कित्येक वर्षे म्हणजे आमच्या पूर्वजांनी सुद्धा कधी कांदा लसूण खाल्ला नाही आणि तीच प्रथा आम्हीही पाळतो. आमच्या गावात मुळी बाजारातून कांदा लसूण खरेदी करून आणण्यालाच बंदी आहे आणि आम्ही सर्वजण हा नियम पाळतो. कांदा महाग झाला म्हणून खायचा नाही असा काही प्रकार येथे नाही. तो स्वस्त मिळाला तरी आम्ही खात नाहीच.

Leave a Comment