अंतराळ स्थानकातील स्वच्छतागृहे नादुरुस्त झाल्याने पंचाईत


आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्यास असलेल्या अंतराळ वीरांना नुकतेच एका अभूतपूर्व अवघड परिस्थितीस सामोरे जावे लागले. रशियन अंतराळ एजन्सी रॉसकॉसमोस नुसार या अंतराळ स्थानकातील दोन्ही स्वच्छतागृहे बिघडल्याने अंतराळवीरांना काही काळ पूर्ण वेळ डायपर घालून वावरावे लागले. मात्र आता दोन्हीतील एक स्वच्छतागृह पुन्हा कार्यान्वित करण्यात यश आले आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहणे हे अगोदरच मोठे मुश्कील काम आहे. पृथ्वीवर ज्या क्रिया आपण सहज करू शकतो त्या तेथे गुरुत्वाकर्षण नसल्याने करता येणे मुश्कील बनते. या अंतराळ स्थानकात दोन स्वच्छतागृहे असून ती दोन्ही रशियानेच बनविलेली आहेत. पैकी एक रशियन विभागात आहे तर दुसरे युएस विभागात आहे. या दोन्हीपैकी एक पूर्ण भरल्याने त्याचा वापर थांबविला गेला होता तर दुसरे अचानक खराब झाले. परिणामी तेथे मुक्कामास असलेल्या अंतराळ वीरांना पूर्ण वेळ डायपर वापरण्याची वेळ आली.

रॉसकॉसमोसने या संदर्भात नवीन अपडेट दिला असून एका स्वच्छतागृहाचा सेपरेटर बदलला गेला असून स्वच्छतागृह वापरण्यायोग्य बनल्याचे जाहीर केले गेले आहे.

अंतराळात स्वच्छतागृहाचे काम कसे चालते या विषयी मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही स्वच्छतागृहांसाठी दोन आउटलेट आहेत आणि त्यात सक्शन फॅन्स बसविले गेले आहेत. त्यामुळे वेस्ट तेथून खेचून घेऊन सरळ बाहेर फेकले जाते. त्यामुळे स्थानकाचा आत कोणतीही घाण राहत नाही.

Leave a Comment