…तर महाराष्ट्रात फडणवीसांना फिरु देणार नाही


मुंबई : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठवल्याचा दावा केल्यानंतर फडणवीसांवर या मुद्द्यावरुन जोरदार टीका होत आहे. फडणवीसांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सडकून टीका केली. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर असताना महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात पाठवले असतील तर राज्यात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, 40 हजार कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी परत केंद्राकडे पाठवल्याचे वक्तव्य भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. जर असे काही फडणवीस यांनी केले असेल, तर ते महाराष्ट्रद्रोही काम आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे परत गेले असतील, तर महाराष्ट्र फडणवीस यांना माफ करणार नाही. त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.

कर्जाचा डोंगरवर राज्यावर आहे. त्यात केंद्र सरकारने दिलेला मदत निधी परत पाठवणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यावर कर्जाचा बोजा वाढवत विकासकामे सुरु केली होती. गुजराती बंधूंनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई नष्ट करण्याचा डाव सुरु केला आहे. त्याच डावाचा बुलेट ट्रेन एक भाग आहे. मुंबई बुलेट ट्रेनच्या नावाखाली तोडण्याचा डाव होता, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.