अतर्क्य पदार्थापासून बनल्या होत्या या कार्स


जपानच्या टोक्यो मोटार शो मध्ये संशोधकांनी सादर केलेल्या एका खास कन्सेप्ट कारची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. सेल्युलोज नॅनो फायबरपासून ही कार बनविली गेली असून हा फायबर लाकूड, शेतीतून वाया जाणारा माल आणि अन्य सेंद्रीय पदार्थापासून बनविला गेला आहे. सध्या या कारचे खूप कौतुक होत असले तरी अश्या वेगळ्या आणि अतर्क्य मटेरियल पासून बनलेली ही काही पहिलीच कार नाही. यापूर्वी म्हणजे अगदी ६०-६२ वर्षापूर्वी सुद्धा संशोधकांनी अश्या वेगळ्या मटेरियल पासून कार्स बनवून त्यांचे उत्पादन केलेले आहे. त्याची थोडी माहिती आमच्या वाचकांसाठी .

चेकोस्लोव्हेकियातील व्हेलोरेक्स ऑटो कंपनीने ऑस्कर नावाची एक कार बनविली होती. १९५४ ते १९७० पर्यंत तिचे उत्पादन सुरु होते. या कारची बॉडी फ्रेम स्टीलची होती मात्र तिला एग्लेट नावाच्या कृत्रिम लेदरने पूर्ण कव्हर केले गेले होते.


दुसरी एक अशीच कार ब्रीक्लीन एस व्ही १ युएस मधील एका हौशी उद्योजकाने तयार केली होती. त्याचे नाव होते माल्कम ब्रीक्लीन. मजबूत सेफ्टी फिचर्स असलेली स्पोर्ट्स कार त्याला बनवायची होती. त्याने अॅक्रेलिक रेझिन आणि फायबर ग्लास वापरून ही एसव्ही १ स्पोर्ट्स कार बनविली आणि १९७४ -७५ मध्ये तिचे उत्पादन सुरु केले होते.


पूर्व जर्मनीतील जुनी ऑटो कंपनी VEB SACHSENRING AUTOMOBIL WERKE ZWICKU ने ड्युरोलास्ट ट्रांबंट नावाने कार बनविली होती. ही हार्ड प्लास्टिक पासून बनविली गेली आणि हे प्लास्टिक रिसायकल मटेरियल पासून तयार केले गेले होते. त्यात प्रेस्ड कॉटन, फायबर, सिंथेटिक रेझिन आणि कपड्यांचे तुकडे वापरले गेले होते. या कारचे १९५७ पासून १९९० पर्यंत उत्पादन केले गेले होते.

Leave a Comment