लंडन ब्रीज हल्लेखोर पाकिस्तानी तर पोलीस भारतीय वंशाचा


सोशल मीडियामुळे जगात कुठे काय चाललेय याची बित्तम बातमी कळायची नव्हे तर त्यावरची जगभरातील लोकांची मते जाणून घेण्याची चांगली सोय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो खुपच वेगाने व्हायरल झाला असून त्याचा संबंध लंडन ब्रीज वर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याशी आहे आणि भारत पाकिस्तान या दोन देशांशी सुद्धा आहे. उस्मान खान नावाच्या माणसाने केलेल्या या हल्ल्यात दोन नागरिकांना प्राण गमवावा लागला होता.

सोशल मिडियावरील फोटोत हल्लेखोर उस्मान खानचा फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे मेट्रोपोलिटन पोलीस सहाय्यक आयुक्त आणि दहशतवादी विरोधी पोलीस दलाचे प्रमुख नील बसू यांचा. फोटोखाली लिहिले गेलेय दोघेही ब्रिटीश नागरिक. एक हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचा तर दुसरा पोलीस अधिकारी भारतीय वंशाचा.

पोलीस अधिकारी नील बसू यांचे वडील कोलकाता येथील डॉक्टर तर आई वेल्श येथे राहणारी नर्स. बसू यांचे वडील नंतर इंग्लंडला आले आणि नील यांचे बालपण इंग्लंड मध्येच गेले आहे. द, टेलिग्राफच्या माहितीप्रमाणे नील याना लहानपणी अनेकदा वंशवादावरून टोमणे ऐकावे लागले पण त्यांनी एक कर्तबगार पोलीस अधिकारी बनून त्याला चोख उत्तर दिले. पदवीनंतर त्यांनी प्रथम बँकेत मग सेल्समन म्हणून नोकरी केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी मेट्रोपोलिटन पोलीस विभागात सार्जंट म्हणून नोकरी घेतली. आपल्या अंगाच्या गुणांनी वर चढत ते आता सहाय्यक आयुक्त आणि दहशदवाद विरोधी पथकाचे प्रमुख बनले आहेत.

या उलट हल्लेखोर उस्मान खान शाळा मधेच सोडलेला आणि कडव्या धर्मवादाने बहकलेला तरुण. त्याच्या बालपणातील काही दिवस आजारी आईसोबत पाकिस्तानात गेले. इंटरनेटवर कट्टरपंथियांचा प्रचार तो करत असे. जानेवारी २०१२ मध्ये त्याला इंग्लंड मध्ये दहशतवाद अधिनियम उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरविले गेले होते. २०१० मध्ये एका गटाने नाताळात दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली त्यात त्याचा समावेश होता. त्याने अलकायदा पासून प्रेरणा घेतल्याचे सांगितले होते. २०१२ मध्ये त्याला ८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पाकव्याप्त काश्मीर मध्ये वडिलोपार्जित जमिनीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना त्याने आखली होती.