सांधेदुखी सतावते तेव्हा..


अनेक व्यक्तीना सांधेदुखीचा असह्य त्रास होत असतो. या व्यक्ती फार काळ उभ्या राहू शकत नाहीत, किंवा एकाच पोझिशन मध्ये फार काळ बसू शकत नाहीत. अश्या व्यक्तींना उठता बसताना देखील फार त्रास होतो. सांधेदुखीचा त्रास थंडीच्या दिवसांमध्ये जास्तच जाणवू लागतो. सांध्यांची नियमित मालिश हे दुखणे काही प्रमाणात कमी करण्यास मदत करते, पण हा दिलासा तात्पुरता असतो. काही काळानंतर सांधेदुखी पुन्हा सुरु होते. ही सांधेदुखी पुष्कळ अंशी कमी करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल. या उपायांनी सांधेदुखी कमी होऊन उठता-बसताना किंवा चालताना होणारा त्रास देखील पुष्कळ प्रमाणात कमी होईल.

सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे चांगले. हळद, लसूण, क जीवनसत्व, मासे आणि ब्रोकोली या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. त्याचबरोबर कॉन्ड्रोईटीन आणि ग्लुकोसमाईन ही दोन तत्वे असलेली सप्लिमेंट्स घेतल्याने देखील सांधेदुखी मध्ये आराम मिळू शकतो.

नियमित व्यायामाने केवळ शरीरच नाही, तर तुमचे मन देखील ताजेतवाने राहते. त्याचबरोबर यामुळे हाडांना आणि शरीरातील इतर मासपेशींना बळ मिळून सांधेदुखी पासून होणारा त्रास कमी होऊ शकतो. ज्यांना इतर कोणताही व्यायाम करणे शक्य नसेल, त्यांनी जमेल तितकी योगासने किंवा नुसतेच चालायला जाणे इतके केल्याने ही फायदा होऊ शकेल. हलका पण नियमित व्यायाम ऑस्टीयोपोरोसीस आणि आर्थ्रायटीस या दोन्ही विकारांकारिता चांगला आहे.

आपल्या पायांच्या सांध्यांवर कोणत्याही प्रकारचे प्रेशर पडेल अशी कुठलीही कृती करणे टाळायला हवे. तसेच सांध्यांची सतत एकाच प्रकारची हालचाल देखील त्रासाची ठरू शकते. त्यामुळे सतत एकाच प्रकारची हालचाल करणे टाळावे. तसेच आपण करीत असलेल्या कामामध्ये अधून मधून काही काळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. कोणतीही जड वस्तू उचलताना देखील त्याचा भार एकदम सांध्यांवर येणार नाही याची काळजी घ्यावी.

आपले वजन झपाट्याने वाढू लागले, तर त्याचा भार आपल्या शरीराच्या सांध्यांवर पडत असतो. त्यामुळे आपले वजन वाढत राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शरीराचे दुखणे सुरू झाले, की मानसिक तणाव देखील वाढायला लागतो. त्यामुळे स्वतःला तणावरहित ठेवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी मेडीटेशन, योग, थेरपी या उपयांचा अवलंब करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment