मारूती सुझुकी बनली इतक्या गाड्या विकणारी पहिली भारतीय कंपनी

भारतातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने मागील 37 वर्षात 2 कोटींपेक्षा अधिक वाहने विक्री करण्याचा किर्तिमान केला आहे. हा आकडा गाठणारी मारूती सुझूकी पहिली व एकमेव भारतीय कार निर्मिती कंपनी आहे. कंपनीला सुरूवातीची 1 कोटी वाहने विकण्यासाठी तब्बल 29 वर्ष लागली तर उर्वरित 1 कोटी वाहने कंपनीने मागील 8 वर्षात विकली आहेत.

कंपनीने 14 डिसेंबर 1983 ला भारतातील सर्वात लोकप्रिय कार मारूती 800 लाँच केली होती. 2 वर्षातच कंपनीने 10 लाख कारची विक्री केली होती. 2005-06 मध्ये कंपनीने 50 लाख कार विक्रीचा विक्रम केला. त्यानंतर पुढील 5 वर्षात कंपनीने आणखी 50 लाख कार विकल्या. 2016-17 पर्यंत कंपनीने दीड कोटी कार्सची विक्री केली होती. मात्र पुढील 2 वर्षातच कंपनीने 2 कोटींचा टप्पा ओलंडला.

कंपनीच्या या कामगिरीबद्दल मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ केनिचि आयुकावा (Kenichi Ayukawa) म्हणाले की, या विक्रमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हा टप्पा गाठणे हे मारूती सुझुकी, त्याचबरोबर आमचे स्प्लायर्स आणि डिलर पार्टनरसाठी देखील एक मोठी कामगिरी आहे. ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

मागील अनेक वर्षात मारूती सुझुकीने भारतीय बाजारात आपले वेगळे अस्तित्व स्थापन केले आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांबरोबरच कंपनीने सीएनजी आणि हायब्रिड गाड्या देखील बाजारात आणल्या आहेत. याशिवाय बीएस 6 कम्प्ल्यांट स्विकारणारी मारूती सुझुकी पहिली कंपनी आहे. सध्या कंपनी इलेक्ट्रिक वाहनांची देखील टेस्टिंग करत आहे.

Leave a Comment