पोर्शेच्या कारमालकाकडून वाहतुक पोलिसांनी वसुल केला तब्बल 9.80 लाखाचा दंड


केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2019 पासून देशभरात वाहतुकीचे नवे नियम लागू केले. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात, काढण्यात आलेल्या एका अधिसूचनेनुसार सरकारकडून देशात वाहतुक कायदा राबवला जात आहे. जर या नव्या नियमांनुसार तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागते आणि त्यासाठी भलामोठा दंड देखील भरावा लागू शकतो. गुजरातमध्ये अशीच एक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका कारमालकाकडून दंडाची रक्कम म्हणून तब्बल 9.80 रुपये वसुल करण्यात आले आहेत.

याबाबतचे एक ट्विट अहमदाबाद पोलिसांनी केले असून त्यात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद शहरात पोलिसांची रुटीन तपासणी चालू होती. पोलिसांनी या दरम्यान एका पोर्श 911 (Porsche 911) गाडी ताब्यात घेतली. या गाडीला नंबरप्लेट नव्हती तसेच आवश्यक ती कागदपत्रेही कारमालकाकडे नव्हती. चौकशी केल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल, पोलिसांनी या गाडीच्या मालकाला तब्बल 9.80 लाखाचा दंड ठोठावला. भारताच्या इतिहासातील वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल झालेल्या हा सर्वात मोठा दंड आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त तेजस पटेल म्हणाले की, वाहतूक पोलिसांनी बुधवारी अहमदाबादच्या हेलमेट चौकात नंबर प्लेट नसल्यामुळे सिल्व्हर रंगाची गाडी थांबविली. विचारणा केली असता वाहन चालकाकडे कागदपत्रे नव्हती. म्हणून आम्ही कार ताब्यात घेतली आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला. याचा अर्थ असा की, आरटीओकडे दंड जमा करावा लागेल आणि गाडी परत मिळविण्यासाठी पावती घेऊन यावे लागेल, तेव्हाच ही गाडी मिळू शकते.

Leave a Comment