त्वचेचे सौंदर्य राखण्याकरिता पाळा हे नियम


आपली त्वचा सुंदर, नितळ, चमकदार असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्या करीता आपण निरनिराळ्या उपायांचा अवलंब देखील करत असतो. बाजारात मिळणारी अनेकविध तेले, त्वचेवरील डाग, मुरुमे शंभर टक्के घालविण्याची खात्री देणारी निरनिराळी क्रीम्स, साबण, फेस वॉश सगळे सगळे वापरून पाहिल्यानंतरही कित्येकदा चेहऱ्यावरील मुरुमे किंवा डाग कमी होत नाहीत. त्या वेळी आपण वापरलेला साबण किंवा क्रीम चांगले नसावे अशी आपण समजूत करून घेतो. पण मुळात त्वचेवर मुरुमे पुटकुळ्या का उद्भवतात याचा विचार मात्र आपण क्वचितच करतो. त्यामुळे आपली त्वचा नितळ सुंदर राहावी असे वाटत असेल निरनिराळ्या प्रसाधनांच्या वापरासोबत काही मूलभूत गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे.

आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही बाकी शरीरावरील त्वचेच्या मानाने खूपच नाजूक असते, व चेहऱ्यावरील त्वचेला प्रदूषण इत्यादी गोष्टींचा प्रत्यक्षपणे सामना करावा लागतो. आपण वापरत असलेली प्रसाधने, मेकअप उतरविण्यासाठी आपण करीत असलेला पाण्याचा किंवा अन्य गोष्टींचा वापर यांचा ही आपल्या त्वचेवर बरा वाईट परिणाम होत असतो. तसेच सतत उन्हामध्ये राहिल्यानेही त्वचेवर डाग येणे, त्वचा लालसर होणे असे प्रकार होत असतात. पण या सर्व गोष्टींखेरीज अजूनही काही गोष्टींमुळे त्वचेवर मुरुमे, पुटकुळ्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्याबद्दल आवश्यक ती काळजी घेणे अगत्याचे ठरते.

काही जणांना सतत चेहऱ्याला काही ना काही कारणांनी चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. म्हणून चेहऱ्याला हात लावण्याआधी आपले हात स्वच्छ असल्याची खात्री करून घ्यावी. दिवस भरामध्ये आपण आपल्या हातांनी निरनिराळ्या वस्तूंना स्पर्श करीत असतो. त्यामुळे त्या वस्तूंवर असलेले किटाणू आपल्या हातांवरही असतात. हात न धूता तसेच चेहऱ्यावर लावले गेले तर त्याद्वारे जंतूंचा संसर्ग होऊन त्वचेवर मुरुमे, इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे वारंवार चेहऱ्यावर हात लावण्याचे टाळावे.

आजकाल आपले मोबाईल फोन आपली जीवनरेखा बनलेले असले तरी त्या मोबाईल फोन वर असंख्य किटाणू असतात. दिवसभरामध्ये आपला मोबाईल फोन कधी खिशात, कधी पर्स मध्ये, कधी हॉटेल मधल्या टेबलवर, तर कधी कधी हात धुताना चक्क वॉशरूम मधील बेसिनच्या कडेवरही विराजमान झालेला असतो. फोन वर बोलताना हाच मोबाईल फोन आपल्या चेहऱ्याच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असतो. त्यावेळी त्यावर असेलेल्या जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाईल फोन वापरण्याआधी तो साफ कपड्याने पुसून घेऊन मगच वापरावा. त्याचप्रमाणे आपल्या बिछान्यावरील चादरी आणि उशांचे अभ्रे ही वरचेवर बदलावेत.

आपण वापरत असलेल्या शॅम्पू, कंडिशनर, हेअर स्प्रे, हेअर डाय इत्यादी प्रसाधानांमुळेही आपल्या चेहऱ्यावर अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नवीन प्रसाधन वापरण्यापूर्वी ते आपल्या त्वचेसाठी अपायकारक नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ही प्रसाधने वापरताना किंवा धुताना ते पाणी आपल्या चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी.

उन्हामुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळत असले तरी अति उन्हाचा तडाखा त्वचेला अपायकारक ठरू शकतो. उन्हामध्ये राहिल्याने कित्येक जणांना चेहऱ्यावर लाल चट्टे उठणे, घामोळे येणे, पुरळ येणे असे त्रास सहन करावे लागतात. तसेच उन्हामध्ये जास्त काळ राहिल्याने त्वचेवर काळसर डाग येऊन त्वचा सुरकुतल्यासारखी दिसू लागते. उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी जास्त मात्रेमध्ये एस पी एफ असलेले सनस्क्रीन वापरावे. तसेच भर उन्हाच्या वेळी घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर पडणे टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment