ऐकावे तेवढे नवल..


ऑलिम्पिक स्पर्धा ह्या जागतिक पातळीवरील विशेष स्पर्धांपैकी एक आहेत. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाकडे साऱ्या जगाचे बारीक लक्ष असते. पण एके काळी या स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक काही प्रमाणात फसवेगिरी देखील करत असत. १९०४ साली फ्रेड लोर्झ या धावपटूने त्या सालची मॅराथॉन जिंकली. त्याने ही स्पर्धा तीन तास तेरा मिनिटे या विक्रमी अवधीत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. त्याला सुवर्णपदक दिलेही गेले, पण ते सुवर्णपदक त्याच्याकडून परत हिरावून घेण्यात आले. याचे कारण मोठे गंमतशीर आहे. लोर्झने मॅराथॉन पळत असताना मधेच एका गाडीतून लिफ्ट घेत स्पर्धेमधील एकूण अंतरापैकी अकरा मैल अंतर गाडीत बसून पार केले. लोर्झ गाडीत बसून जात असताना अनेक प्रेक्षकांनी पाहिले आणि त्यांनी तक्रार केल्यांनतर खरा प्रकार आयोजकांसमोर आला. त्यानंतर लोर्झ वर सर्व स्पर्धांसाठी आजीवन बंदी घालण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या थॉमस हिक्स ला विजेता घोषित करण्यात आले.

१८९८ साली युगांडा येथे बांधकाम करणाऱ्या काही मजुरांना रेल्वे पुलावर एक लहान इमारत बांधण्याच्या कामी नेमले गेले. हा पूल त्सावो नदीवर बनेलेला होता. सर्व काम सुरळीत सुरु होते. पण अचानक एके दिवशी तिथे काम करणाऱ्या बांधकाम मजुरांपैकी एकेक जण कमी होऊ लागला. सुरुवातीला यामागचे कारण कोणालाच समजेना, पण हळू हळू जसजसे मजूर गायब होऊ लागले, तसे त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. कालांतराने या प्रयत्नांना यश आले. तिथे अचानकच प्रकट झालेल्या दोन सिहांमुळे मजूर एकेक करून गायब होत असल्याचे स्पष्ट झाले. हे सिंह दिवसभर लपून रहात असत, आणि रात्री सगळीकडे सामसूम झाल्यानंतर मजुरांच्या वस्तीमध्ये शिरून एखाद्या बेसावध मजुराची शिकार करीत असत. अखेरीस लेफ्टनंट कर्नल जॉन हार्वी यांनी त्या सिंहांची शिकार केल्यानंतर हे मृत्यचे थैमान संपुष्टात आले.

राजकीय नेत्यांविषयी सामान्य नागरिकांच्या मनात असलेली संतापाची भावना आजकालच्या युगामध्ये फेसबुक, ट्विटर, मोर्चे, घोषणा यांच्या माध्यमातून दिसून येते. पण प्रागमध्ये पंधराव्या शतकामध्ये जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या राजकीय नेत्यांना चक्क इमारतीच्या खिडक्यांमधून बाहेर ढकलून दिल्याच्या घटना इतिहासामध्ये नोंदल्या गेल्या आहेत. त्याकाळी प्राग येथे कॅथलिक चर्च ने सत्ता आपल्या हाती घेतली होती. चर्च मधील अधिकारी धनदौलत लुटण्यात गुंगले होते. धर्माचे प्रतीक आणि जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या या संस्थेच्या अधिकाऱ्यांचे असे वर्तन बघून जनता अस्वस्थ होत होती. चर्चच्या या मनमानी कारभाराविरुद्ध झेलीव्स्की नावच्या धर्माप्रचारकाने आंदोलन सुरु करीत जनजागृती करण्यास सुरुवात केली. आधीच अस्वस्थ असलेल्या जनतेला झेलीव्स्कीचे म्हणणे पटू लागले आणि हळूहळू जनतेचा कौल त्यालाच मिळण्याची चिन्हे दिसू लागली. एकदा एका सभेमध्ये झेलीव्स्की भाषण देत असताना तेथील टाऊन हॉल मध्ये जमलेल्या चर्चच्या अधिकाऱ्यांनी झेलीव्स्कीवर दगडांचा वर्षाव सुरु केला. चर्चच्या अधिकाऱ्यांवर आधीच नाराज असलेली जनता यामुळे अधिकच संतापली आणि त्यांनी टाऊन हॉल मध्ये घुसून चर्चच्या अधिकाऱ्यांना चक्क खिडक्यांमधून खाली फेकून दिले.

काही व्यक्ती काही ना काही अडचणी आल्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यापासून वंचित राहतात. पण लॅरी वॉल्टर्स हा अमेरिकेतील रहिवासी सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. आपण वायुसेनेमध्ये भरती होऊन वैमानिक व्हावे असे लॅरीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण मोठेपणी दृष्टीदोष निर्माण झाल्याने लॅरीला आपले वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. तरीही लॅरीने धीर सोडला नाही. त्याने आपले स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचा एक अजब मार्ग शोधून काढला. त्याने आपल्या खुर्चीला चक्क ४२ वेदर बलून्स ( आकाशात तरंगणारे फुगे ) बांधून आकाशामध्ये उड्डाण केले. त्या फुग्यांच्या मदतीने वॉल्टर्स ने तब्बल सोळा हजार फुटांची उंची गाठली. इतक्या उंचीवरून परत जमिनीवर उतारण्याकरिता पेलेट गनच्या मदतीने एकेक फुगा फोडून खाली उतरण्याचे त्याने ठरविले. त्यानुसार काही फुगे त्याने फोडले आणि त्याची खुर्ची परत जमिनीच्या दिशेने खाली उतरू लागली. पण अजून फुगे फोडण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या हातातील पेलेट गन खाली पडून गेली. सुदैवाने वॉल्टर्स ची खुर्ची काही विजेच्या तारांमध्ये अडकल्याने तो जमिनीवर सुखरूप उतरू शकला. पण त्याच्या या प्रतापामुळे विजेच्या तारा मोडून त्या परिसरातील वीज मात्र पुढील काही तासांसाठी गायब झाली.

Leave a Comment