मानेचा मसाज जीवघेणा ठरू शकतो


केस कापायला गेलो की, सलूनमधील कारागिर आपले केसच कापतो असे नाही तर अनेक प्रकारे मरम्मत करत असतो. केस कापून झाले किंवा दाढी झाली की ही मरम्मत सुरू होते. आधी डोक्याला तेल लावून डोक्याचा मसाज केला जातो मग मसाज करणारा हात खाली खाली येत आपल्या मानेजवळ येतो. मानेवर हात दाबून ती छान दाबली जाते आणि मग एका हातात हनुवटी आणि एका हातात डोके पकडून मान मोडली जाते. अशी मान मोडली आणि मानेला मसाज मिळाला की गॅाहकाला आनंद मिळतो आणि तो फ्रेश होतो. बरे वाटते पण या कामात आपल्या मानेच्या काही नसा दुखावल्या जातात आणि श्‍वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. काही वेळा तर यातून कायमची दुखापत होण्याची शक्यता असते.

या मसाजने ज्या नसा दुखावल्या जातात त्या श्‍वास घेण्याशी संबंधित असल्याने मोठा त्रास होतो कारण माणसासाठी श्‍वास सर्वात महत्त्वाचा आहे. एका रुग्णावर या मसाजचा असा परिणाम झाला आणि काही वेळाने त्याला श्‍वास घेणे त्रासदायक व्हायला लागले. तो हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याची ही अवस्था बघून डॉक्टरांनाही त्याला नेमके काय झाले असावे याचा अंदाज येईना म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या तपासण्या करून पाहिल्या पण काही बोध होईना म्हणून त्यांनी त्याची छाती नीट तपासली कारण त्याला श्‍वासाचा असा त्रास व्हावा असा काही आजार नव्हता.

त्याची छाती तपासली तेव्हा असे लक्षात आले की नेहमी श्‍वास घेताना छाती भात्यासारखी खाली वर होतच नाही. त्याला छाती वर ओढावी लागत आहे कारण छातीचा भाता चालवणार्‍या नसा कायमच्या दुखावल्या होत्या. शेवटी त्याला त्याने गेल्या दोन दिवसात काय काय केले आहे याची माहिती विचारली तेव्हा त्याने या मसाजची माहिती दिली आणि सारा उलगडा झाला. आता त्याला एक उपकरण बसवले असल्याने श्‍वास घेता येत आहे पण हे यंत्र कायम बसवावे लागणार आहे. या प्रकरणाचा विचार करून सर्वांनी सलूनमध्ये गेल्यानंतर मसाज करताना काळजी घ्यावी. डोक्याला मसाज केला जातो तो ठीक आहे पण मानेला मसाज नको. विशेषत: कटकन मान मोडण्याचाही प्रकार नको असे सलूनच्या कारागिराला सांगावे. तज्ज्ञांच्या मते मान मोडण्याने तात्पुरते बरे वाटत असले तरीही एखादे वेळी त्यामुळे लकवाही होऊ शकतो. शिवाय मान मोडण्याने कसलाही फायदा होत नसतो. म्हणून ते टाळावेच.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment