चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला नवाब मलिकांचे प्रत्युत्तर


मुंबई- विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी गुप्त मतदानाला का भिता, हिम्मत असेल तर गुप्त मतदान होऊ द्या, असे आव्हानही महाविकास आघाडीला दिले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले की, नियमाला धरूनच खुले मतदान हे आहे. कुठेही नियमभंग यात नाही. फोडाफोडीचे प्रयत्न भाजपकडूनच सुरू आहेत. त्यांनी धमक्या देऊ नयेत. उलट त्यांनीच आमचे खुल्या मतदानाचे आव्हान स्वीकारावे.

भाजपने ठाकरे सरकारच्या शपथविधीवर आक्षेप घेतला. नवाब मलिक यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आम्हालाही महापुरुषांबद्दल आदर आहे. शपथविधी हा शपथविधी असतो. चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसे असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजप दावा करत आहे की, 119 आमदार त्यांच्याकडे आहेत. स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष, पण तशी परिस्थिती आज नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचे भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावे. भाजपने प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी, असेही नवाब मलिक म्हणाले.

Leave a Comment