फास्टॅगला 15 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ


नवी दिल्ली – 1 डिसेंबरपासून सर्व वाहनांचा टोल हा केवळ फास्टॅगनेच घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले होते. पण आता फास्टॅगच्या सक्तीला केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला. त्यानंतर महामार्गावारील टोलनाक्यांवर फास्टॅगचा पास असणे सर्व वाहनांना बंधनकारक असणार आहे.

टोल भरण्याची प्रीपेड सुविधा असलेला फास्टॅग ही पास आहे. यामध्ये वाहनावर लावण्यात आलेल्या स्टिकरमुळे स्वयंचलितपणे टोलचे पैसे घेतले जातात. या सुविधेमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज लागत नाही. फास्टॅग खरेदी करण्यासाठी नागरिकांना वेळ मिळावा, यासाठी फास्टॅगला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माय फास्टॅग अॅप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लाँच केले आहे. 15 डिसेंबरपर्यंत वाहनांना फास्टॅगची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. जर फास्टॅगचा पास नसतानाही फास्टॅगच्या रांगेतून वाहन नेण्यात आले तर चालकाकडून 15 डिसेंबरनंतर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.

वाहतुकदार, टोल प्लाझा चालक आणि सरकारला फास्टॅग यंत्रणेमुळे फायदा होणार आहे. वापरकर्त्या वाहतूकदाराला फास्टॅग यंत्रणेच्या प्रती व्यवहारावर २.५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच, या प्लाझावर विनाथांबा वाहतूक असल्याने वाहतुकदारांच्या वेळेची बचत होणार आहे. ईपेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखाही ठेवता येणार आहे.

चालकांना फास्टॅगमुळे टोल प्लाझावर वाया जाणाऱ्या वेळात बचत होणार आहे. स्वयंचलित एकीकृत संगणकीय व्यवस्थेमुळे प्लाझा चालकांना लेखे-जोखे अद्ययावत ठेवता येणार आहेत. तसेच, कमीत- कमी यंत्रणा राबवून प्रभावी सुविधा पुरवता येणार आहे. फास्टॅगमुळे केंद्र व राज्य शासनाला इंधन बचत करणे, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटविणे शक्य होईल. तसेच टोल प्लाझा व्यवस्थेमध्ये पारदर्शिता ठेवता येणार आहे व या यंत्रेणस गतीही देता येईल.

Leave a Comment