फेंग शुई सल्लागार


वास्तूशास्त्राला अलिकडच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. बांधकाम व्यावसायिकही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरांची आखणी आणि उभारणी करताना दिसून येतात. वास्तूशास्त्रामध्ये फेंग शुईचा विचार प्राधान्याने केला जातो. वस्तुतः, ही एक सौंदर्यशास्त्राची प्राचीन चीन पद्धत होय. फेंग शुईचा वापर केल्याने घरात समृद्धी आणि सुखशांती लाभते, असा विचार वाढल्याने या पद्धतीला मोठी मागणी आहे. साहजिकच त्यामुळे फेंग शुई सल्लागार नामक एक नवी करिअरवाट उपलब्ध झाली आहे.

आरोग्य आणि जीवनशैली सुधारणा करण्यासाठी फेंग शुईचा वापर अनेक वर्षापासून केला जात आहे. फेंग शुई यांचे इंग्रजीत अनुवाद केल्यास हवा पाणी असे होते. ऐतिहासिक संदर्भ पाहायचा झाल्यास फेंग शुईचा उपयोग मांगल्याचे प्रतिक म्हणून केला जातो आणि कार्यालय, निवासस्थान यासारख्या अन्य निर्मितीच्या कामात फेंगशुईचा व्यापक प्रमाणात वापर केला जातो. फेंग शुईचे घरातील स्थान पाणी, आकाशातील तारे आणि होकायंत्राच्या साह्याने निश्‍चित केले जाते. 1960 च्या दशकात सांस्कृतिक क्रांतीदरम्यान चीनमध्ये फेंग शुई कला चिरडण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र त्यानंतर विशेषत: अमेरिकेत या कलेच्या लोकप्रियेत वाढ झाली. आता भारतातही फेंग शुईचा वापर वाढला आहे. यामागचे कारण म्हणजे वास्तूशास्त्राचा विचार करण्याचे वाढलेले प्रमाण आणि भविष्यकाराचा सल्ला. परिणामी अनेक ठिकाणी फेंग शुईचा सल्ला देणाऱ्या मंडळींची संख्या वाढली आहे. अनेक बिल्डर्स, वास्तूशास्त्राचे सल्लागार हे फेंग शुई तज्ज्ञांची नियुक्ती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे फेंग शुईचे शास्त्रोक्त ज्ञान घेऊन करियरची सुरवात करता येते.

अभ्यासक्रमविषयक : देशातील अनेक वास्तू आणि भविष्यशास्त्राच्या संस्था फेंग शुईबाबत अल्पकाळासाठीचे अभ्यासक्रम शिकवतात. फेंग शुईची लोकप्रियता वाढल्याने अभ्यासक्रमाचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. फेंग शुई शास्रातील पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या शाखेला प्रवेश घेऊन महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून पुढील शिक्षण घेता येऊ शकते.

करियरला संधी: फेंग शुई आणि भविष्यशास्त्रासंबंधीची पदवी प्राप्त केल्यानंतर बांधकाम कंपनी, इंटेरियर डझाईन कंपनीकडे फेंग शुई सल्लागार म्हणून काम करता येऊ शकते. घर, फ्लॅट, बंगलो, कंपनीचे कार्यालय, शॉप्स आदी ठिकाणी व्यवसायवृद्धीसाठी आणि घरात सुखशांती नांदावी यासाठी फेंग शुईचे तंत्र कसे वापरावे याबाबत सल्ला हे उमेदवार देतात. नोकरी करायची नसेल तर स्वतंत्रपणे व्यवसायदेखील करता येतो. तसेच फेंग शुई अध्यापन वर्ग देखील चालवता येऊ शकतात.

Leave a Comment