चंद्रकांत पाटलांच्या मते महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर


मुंबई – गुरूवारी शिवतीर्थावर लाखो लोकांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या शपथविधी सोहळ्यावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशी असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर राज्यपालांकडे याविरोधात एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असून त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील अनेकदा टोकले. शपथविधीसाठी एक प्रोटोकॉल असते. त्या प्रोटोकॉलनुसारच शपथ घ्यावी लागते. पण नव्या सरकारकडून प्रोटोकॉलनुसार शपथ घेण्यात आली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसेच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. यावर राज्यपालांनी योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते, असे ते म्हणाले.

नियम धाब्यावर बसवून नव्या सरकारकडून काम करण्यात येत आहे. हंगामी अध्यक्षांची निवड राज्यपालांकडून झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सरकारने कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असे पहिल्यांदाच घडत असल्याचे पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment