गोंदवून घेताना काळजी घ्या


फार पुरातन काळापासून भारतात विशेेषत: ग्रामीण भागात कान, नाक टोचून घेण्याचा आणि गोंदवून घेण्याचा प्रघात आहे. ते महिलांचे प्रसाधन समजले जाते पण आता हाच प्रकार टॅटू नावाने आणि पिअरसिंग या नव्या रूपात अवतरला आहे आणि महिलांपेक्षा पु़रुषच अधिक प्रमाणात त्याच्या नादी लागले आहेत. अर्थात हा सारा प्रकार आता भारतातल्या जुन्या प्रकारांपेक्षा वेगळा आहे आणि त्यासाठी काही रसायने वापरली जात आहेत म्हणूनच ही कामे करून घेताना जरा जपून राहिले पाहिजे आणि काही पूर्व काळजी घेतली पाहिजे असा सल्ला दिला जात आहे. यातली पहिली काळजी म्हणजे टॅटू पार्लर हे पूर्ण निर्जंतुक करून घेण्यात आलेले आहे की नाही हे पाहणे.

पार्लर निर्जंतुक करण्यात आलेले नसेल तर कसलाही संसर्ग होण्याची भीती असते. शिवाय आपण ही कामे करून घेतल्यानंतर काय पथ्ये पाळली पाहिजेत आणि टॅटू नंतर काय काय दक्षता घेतल्या पाहिजेत याच्या सूचना या पार्लरमधून आपल्याला दिल्या गेल्या पाहिजेत. सध्या तरुण पिढी या प्रकारांच्या मागे लागली आहे पण त्यामानाने टॅटू पार्लर किंवा सलूनमध्ये त्यांना कोणती काळजी घ्यावी याच्या सूचना दिल्या जात नाहीत. त्याचे काही दुष्परिणाम जाणवायला लागले असून अमेरिकेतल्या अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या संस्थेकडे याबाबत काही तक्रारी यायला लागल्या आहेत. या संस्थेने मुलांना आणि मुलींनाही अशी सूचना केली आहे की त्यांनी टॅटू किंवा पिअर्सिंग करून घेण्यापूर्वी आपल्या पालकांना माहिती दिली पाहिजे.

अशा प्रकारच्या काळज्या न घेतल्याचे काही दूरगामी परिणाम काही मुला मुलींनी भोगावे लागले आहेत. काहींना गंभीर स्वरूपाच्या संसर्गाला तोंड द्यावे लागले आहे तर काहींना तर आपल्या हातातल्या नोकरीच्या संधी सोडाव्या लागल्या आहेत. तेव्हा आपण ज्या सलूनमध्ये टॅटू करून घेत आहोत ते प्रतिष्ठित असावे आणि तिथे स्वच्छता पाळण्यात आलेली असावी हे पाहणे तरुणा तरुणींच्या हिताचे आहे. टॅटू करून घेताना तर मोठा खर्च यायला लागला आहेच पण ते मिटवणे हेही मोठ्या खर्चाचे होऊन बसले आहे. या खर्चाचा विचार करून आपण सावधपणाने त्याची निवड केली पाहिजेच पण अमेरिकेत तर असे टॅटू सलून सरकारी परवानगी शिवाय उघडता येत नाहीत याची दखल घेऊन आपले सलून मान्यताप्राप्त आहे की नाही याची माहिती करून घ्यावी आणि मगच तिथे पाऊल टाकावे असेही सुचविण्यात येत आहे.

Leave a Comment