सौंदर्यप्रसाधने वापरताना ..


आजच्या नव्या युगातील नवी पिढी स्वतःच्या वेशभूषेच्या बाबतीत जास्त जागरूक असलेली दिसते. आपण नीटनेटके दिसावे हा आग्रह एखाद्या गृहिणीपासून ते शाळा-कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक किशोरीचा असतो. प्रसाधनांचा वापर हा आता केवळ स्त्रीवर्गापुरता मर्यादित नाही, तर पुरुष मंडळीही आपापल्या आवडी आणि गरजा लक्षात घेऊन सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. सध्याच्या फॅशन ट्रेंड्स लक्षात घेऊन आपण आपली वेशभूषा आणि प्रसाधने निवडत असतो. आजकाल नित्य नवी प्रसाधने बाजारात येत असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार प्रसाधनांची निवड करू शकते. पण ही प्रसाधने वापरताना काही गोष्टींची काळजी आपण घेतल्यास, प्रसाधनाच्या वापरामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

आपल्या चेहेऱ्यावर प्रसाधनांचा वापर करण्याआधी चेहरा थंड पाण्याने, एखादा चांगला फेसवॉश वापरून स्वच्छ धुवून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी पाणी फार गरम नसावे. थंड पाणी सहन होत नसल्यास कोमट पाण्याचा वापर करावा. चेहरा धुतल्यानंतर साफ टॉवेलने पुसून घेऊन त्यानंतर एखादे चांगले मॉईश्चरायझर लाऊन घेऊन मगच इतर प्रसाधनांचा वापर करावा.

एखाद्या जार किंवा लहान बाटलीमध्ये जी प्रसाधने उपलब्ध असतात, ती जारमधून हाताने काढून घेऊन मग लावावी लागतात. जर हात स्वच्छ न धुता तसेच जारमध्ये घातले गेले, तर आपल्या बोटांवर असलेले जंतू प्रसाधनाच्या जारमध्ये प्रवेश करु शकतात. त्यामुळे प्रसाधनांचा वापर करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत. जारमधील प्रसाधने इतरांना वापरण्यास शक्यतो देऊ नये, त्याचप्रमाणे आपण ही इतरांची प्रसाधने वापरणे टाळावे.

डोळ्यांच्या पापण्यांना लावण्याच्या मस्काराच्या ब्रशद्वारे, किंवा मेकअपच्या इतर ब्रशेस द्वारे बॅक्टेरियांचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे दर थोड्या दिवसांच्या अवधीनंतर मस्काराचा ब्रश, तसेच मेकअपसाठी लागणारे इतर ब्रशही कोमट पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू घालून, त्यामध्ये स्वच्छ धुवावेत. ब्रशेस धुतल्यानंतर ते व्यवस्थित कोरडे करून मगच वापरात घ्यावेत.

रेझर, भुवयांना रेखीव करण्यासाठी वापरले जाणारे ट्वीझर्स किंवा चिमटे दरवेळी वापरून झाल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडे करावेत. विशेषतः रेझर, जर साफ न करता परत परत वापरले, तर त्यामधील बॅक्टेरियांमुळे त्वचेचे इन्फेक्शन उद्भवू शकते, किवा मुरुमे, पुटकुळ्या उद्भवू शकतात. रेझर धुतल्यानंतर कोरडे केले नाही तर त्याच्या ब्लेड्सना गंज लागून ते वापरण्यास धोकादायक ठरू शकतात.

आपण वापरात असलेले कंगवे देखील स्वच्छ ठेवावयास हवेत. दर दोन ते तीन आठवड्यांनी आपण वापरात असलेले सर्व कंगवे एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन, त्यामध्ये थोडासा शॅम्पू घालून त्यामध्ये बुडवून ठेवावेत. एखादा जुना टूथब्रश घेऊन त्याने कंगव्यांचे दात व्यवस्थित स्वच्छ करावे. त्यानंतर कंगवे स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून कोरडे करून घ्यावे.

महिलांनी लिपस्टिक किंवा लिप बाम सारखी प्रसाधने वैयक्तिक वापरासाठीच ठेवावीत. ही प्रसाधने इतरांना वापरायला देणे किंवा इतरांनी वापरलेली लिपस्टिक आपण वापरणे आवर्जून टाळायला हवे. तसेच लिपस्टिक लावताना शक्यतो त्यासाठी जो खास ब्रश तयार केला जातो, त्याचा वापर करणे उत्तम. रात्री झोपण्याआधी आपला मेकअप खोबरेल तेल किंवा बेबी ऑईल च्या मदतीने पूर्णपणे काढून टाकावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

Leave a Comment