उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दरम्यान ट्विटरवर #SorryBalaSaheb ट्रेंड


मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेतली. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. याच दरम्यान ट्विटरवर #SorryBalaSaheb हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी ट्रेंड होऊ लागले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात येत असल्याने ट्विटरवर काही नाराज नेटकऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे माफी मागत शिवसेनेला त्यांच्या आधीच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.


दरम्यान, काल उद्धव ठाकरेंच्या शपथविधी आधी महाराष्ट्रात सत्तेवर येणाऱ्या महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली. आपल्या विकास कार्यक्रमात नव्या सरकारने स्थानिक भुमिपूत्रांच्या रोजगाराला प्राधान्य दिले असून स्थानिक भुमिपूत्रांना उद्योग-व्यवसायात ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यासाठी कायदा बनवण्यात येणार आहे. शिवसेनेची सुरुवातीपासूनची महाराष्ट्रात स्थानिक भुमिपूत्रांना नोकऱ्यांमध्ये पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे ही भूमिका होती.


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करेल, तसेच युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ठाकरे- पवार कुटुंबियांमध्ये घरोब्याचे संबंध आहेत.

Leave a Comment