मध : निसर्गाचा चमत्कार


मधाचे महत्त्व तसे आपल्याला कोणी समजावून सांगावेत असे नाही. पण निसर्गाने आपल्याला बहाल केलेले ते एक आश्‍चर्य आहे. आयुर्वेदात तर मधाला फार महत्त्व दिले जाते. अनेक औषधे मधासोबत घेण्याचा वैद्यांचा सल्ला असतोच पण काहंी चाटणे ही मधात घ्यावीत असे सांगितलेले असते. मधाची पोळी जंगलात अनेक झाडांना टांगलेली आढळतात. रानात जनावरे चारायला आणणारे गुराखी अशी मोहळे झोडपून त्यातला मध यथेच्छ खात असतात. त्यांना अशा रितीने जंगलातला मध शुद्ध स्वरूपात खायला मिळत असल्याने ती मुले तब्येतीने अगदी ठणठणीत असतात. आजार त्यांच्या आसपासही फिरकत नाहीत.

आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असल्याने खाद्यपदार्थांची गोडी चाखण्याची संधी लोकांना मिळत नाही पण त्यांना कधीमधी तोंड गोड करावेसे वाटले तर त्यांना एखादा चमचाभर मध खाण्यास काही हरकत नाही. त्याबाबतीत मध उपयुक्त ठरतो. जंगलात सापडणारा हा मूळ आणि शुद्ध मध हे एक प्रकारचे सुपर फूड आहे. त्यात अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात. शिवाय त्यात कर्करोग प्रतिबंधक गुणधर्मही असतो. त्यात ओतप्रोत भरून असलेली मौलिक द्रव्ये आयर्न, झिंक,पोटॅशियम, कॅल्शीयम, फॉस्फरस, रिबोफ्लेवीन आणि नायसीन ही आहेत. ही द्रव्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामावून असलेले मध हे एकमेव औषध या जगात असेल, ही सगळी द्रव्ये, पोषक म्हणून तर गुणकारी आहेतच पण पचन संस्थेत निरोगी जंतूंची वाढ होण्यास ते प्रेरक ठरते आणि त्यामुळे पचन शक्ती वाढते.

एक चमचाभर मध म्हणजे ६४ कॅलरीज. एका केळाएवढे गुणकारी असते. असा आहे मधाचा महिमा पण त्याचे एवढे फायदे हवे असतील तर मध हा शुद्ध स्वरूपाच मिळवला पाहिजे. अनेकदा काही जंगलातले लोक एका काठीला काही झोडपलेली मोहळे टांगून त्यातला मध विकण्याच्या निमित्ताने दारावर येतात आणि हा निसर्गातला शुद्ध मधच आहे असे मानून आपण तो घेण्याचा विचार करतो पण असे लोक नकळतपणे आपल्याला मध म्हणून काकवी विकून मोकळे होतात. कारण त्यांच्याकडील मधाचे पोळे काकवीत बुडवून आणलेले असतात. त्यांतून काकवी म्हणजेच पाक टपकत असतो. त्यामुळे तो मधच आहे असा आपल्याला भास होतो. पण आपण तो मध घेऊन घरात एखाद्या बरणीत ठेवतो तेव्हा काही दिवसातच तो मध नसल्याचे दिसून येते. तेव्हा मध घेताना पारखून घ्यावा किंवा खात्रीचा मध कंपनीकडूनच खरेदी करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment