खाण्याचा त्वचेवर परिणाम


आहारतज्ञ खाण्याबाबत अनेक सूचना देत असतात आणि आपण काय खावे तसेच काय नाही याबाबत मार्गदर्शन करीत असतात पण खाण्याचे आपल्या त्वचेवर परिणाम होत असतात असे सांगत आता या आहार शास्त्रात त्वचा विकार तज्ञांनीही प्रवेश केला आहे. आपण काय खातो याबरोबरच कधी खातो याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो असे मत त्यांनी आता व्यक्त केले असून त्यावर काही प्रयोगही केले आहेत. अवेळी खाण्याने त्वचा लवकर सुरकतायला लागते आणि चेहर्‍यावर वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसायला लागतात असे त्यांना आढळले आहे. तेव्हा खाण्याच्या वेळेबाबत शिस्त पाळत नसाल तर लवकर म्हातारे दिसायला लागाल असा इशाराच या तज्ञांनी दिला आहे.

या बाबत चीनमधील ग्वॉंग्त्सी विद्यापीठ तसेच अमेरिकेतील डल्लस येथील साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी यावर संशोधन सुरू केले आहे. त्यांना असे आढळले आहे की, अवेळी खाण्याने त्वचेवरील अशी जनुके विस्कळीत होतात की जी आपल्या त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करीत असतात. या जनुकाचे नाव एक्सपीए असे असते. अशी माहिती ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटलचे त्वचा रोग विभागाचे प्रमुख डॉ. सौरभ शहा यांनी दिली. म्हणूनच वेळेवर खाणे ही संकल्पना आता समोर येत आहे असे डॉ. शहा म्हणाले. रात्री उशिरा खाणाराच्या त्वचेवरील हे जनुक विस्कळीत होते आणि ते उन्हातल्या युव्ही किरणांला बळी पडते. परिणामी रात्री खाणाराला उन्हाचा त्रास होऊन त्यांच्या चेहर्‍यावर काळे डाग पडण्याची शक्यता असते.

माहीमच्या रहेजा फोर्टीज असोसिएक हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. रिन्की कपूर यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. आपल्या त्वचेवर उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी एक प्रकारचे एन्झाईम काम करीत असते. रात्री बेरात्री खाण्याने आपल्या त्वचेचे वेळापत्रक बदलते. हे एन्झाईम दिवसा काम करून आपल्या त्वचेचा उन्हापासून बचाव करीत असते पण ते आता रात्रीच्या खाण्याने दिवसा निष्प्रभ होते आणि आपल्या त्वचेेचा सूर्यकिरणांपासून बचाव करण्यास असमर्थ ठरते. आपली त्वचा हे शरीरातल्या विषारी द्रव्यांना बाहेर टाकण्याचे मोठे साधन आहे. पण तिच्या त्या क्षमतेवर विपरीत परिणाम करणारे काही घडले की ती विषारी द्रव्यांना बाहेर फेकण्याचे काम करू शकत नाही आणि परिणामी त्याचा आपल्या एकूणच आरोग्यावर परिणाम होत असतो. तेव्हा पाणी वेळेवर आणि पुरेसे पिणे तसेच व्यसने टाळणे हे त्यासाठी गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment