नोकरी, व्यवसायात यशस्वी व्हा…


यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करायला हवा, आपण हाती घेतलेले काम मध्येच सोडू नये, असे आपल्याला नेहमीच सांगितले जाते. मात्र हे देखील खरे की, एखादे काम आपल्याला कंटाळवाणे वाटत असेल किंवा आपण ते बळजबरीने करत असाल तर असे काम शक्‍य तितक्‍या लवकर सोडलेले अधिक चांगले. कारण अशा अनावश्‍यक कामामुळे आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय होण्याची शक्‍यता अधिक असते.

आळशीपणा, निर्णयक्षमता नसणे, कामात उरक नसणे, समन्वयात चालढकलपणा, संवादाचा अभाव, कार्यक्षमतेचा अभाव आदी ढोबळ कारणे अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे काही वाईट सवयींमुळे देखील आपण यशापासून दूर जावू शकतो. अन्य लोकांना गृहीत धरणे, चुकांवर पांघरून घालणे किंवा चूक मान्य न करणे, कामास सुधारणा न करणे, वेळ न पाळणे या चुकीच्या सवयी पायावर धोंडा पाडून घेण्यासारख्या असतात. याशिवाय विकासात अडथळे आणणाऱ्या काही गोष्टी सोडून दिल्यास किंवा वर्ज्य केल्यास यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो.

स्वत:वर संशय घेणे – यशस्वी होण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी स्वत:वर विश्‍वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण स्वत:च्याच कार्यक्षमतेवर शंका घेतली किंवा संशय घेतला तर आपण कोणतेही काम पूर्णपणे विश्‍वासाने पूर्ण करू शकणार नाहीत. आपण स्वत:च जर आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करू लागलो तर अन्य मंडळी देखील आपल्या क्षमतेवर विश्‍वास ठेवणार नाही. यात अपयश पदरात पडण्याची भिती अधिक असते. जर आपल्याला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आपण आपल्या कामावर, कार्यक्षमतेवर आणि निर्णयक्षमतेवर विश्‍वास ठेवणे महत्त्वाचे आहे. अशी वृत्ती बाळगली तरच आपल्यावर अन्य मंडळी, कंपनी विश्‍वास टाकतील.

पर्यायांचा अभाव – प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी कोणता ना कोणता पर्याय असतो. जर आपल्याकडे काम करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नाही, असा जर विचार करत असाल तर अशा प्रकारची विचारसरणी सोडून देणे श्रेयस्कर ठरते. प्रत्येक प्रश्‍नावर उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. फक्त ते उत्तर आपल्याला शोधावे लागते. आपल्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे की, नाक दाबले की तोंड उघडते. याच रितीने एखादा जर मार्ग बंद झाला तर अन्य मार्ग आपोआप खुले होतात. केवळ तो मार्ग शोधणे आपल्यावर अवलंबून असते. आपण जर हातावर हात ठेवून बसून राहिलो तर प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत. उलट अडचणीत भर पडत जाते.

सर्व कामे आपोआप होतील – कोणाचेही काम कोणावाचून अडत नाही. सर्व कामे तडीस जातात, हे जरी खरे असले तरी आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे
लागतात, हेही तितकेच खरे. सर्व कामे आपोआप होतात, असा जर विचार बाळगून काम करत असाल तर तो चुकीचा विचार आहे. जोपर्यंत आपण एखादे काम पूर्ण करण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करीत नाहीत, तोपर्यंत काम पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, कोणतेही काम आपोआप होत नाही. आपल्याला सर्व कामे योग्य तऱ्हेने आणि मार्गाने पूर्णत्वास न्यावी लागतात. तेव्हाच कामे मार्गी लागतात. आपोआप कोणतेच काम होत नाही, हे लक्षात ठेवा. आपण जरी ते काम केले नाही तरी अन्य व्यक्ती तो काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

कामात चालढकलपणा – आपण नेहमीच कामात चालढकल करणारे, टाळाटाळ करणारे लोक पाहिले असतील. जर आपल्याला देखील हिच सवय असेल तर आपण कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कंपनीने किंवा संस्थेने एखादे काम आपल्यावर सोपवले असेल तर ते जबाबदारीने न पार पाडता चालढकल करत असाल किंवा जबाबदारी टाळत असाल तर आपल्या उज्ज्वल करियरसाठी ती बाब धोकादायक ठरू शकते. या कारणावरून आपण ते काम कधीही पूर्ण करू शकणार नाही आणि आपण कधीही प्रगती करू शकणार नाहीत. यशस्वी होण्यासाठी आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय सोडून द्यायला हवी. कोणतेही काम वेळेत पूर्ण करणे ही यशाची पहिली पायरी होय.

एकच काम करणे – जर आपण एखाद्या कामाकडे एकाच पद्धतीने किंवा विचाराने पाहत असाल तर त्याचा परिणामही सारखाच निघू शकतो. आपण कितीही वेगळ्या परिणामाची अपेक्षा केली तरी तो वेगळा परिणाम आपल्या पदरी कधीच पडू शकत नाही. जोपर्यंत आपण एकाच बाजूने विचार करण्याची किंवा काम करण्याची पद्धत सोडून देत नाहीत, तोपर्यंत वेगळा परिणाम आपल्या हाती येणार नाही किंवा दिसणार नाही. जर आपल्याला वेगळा आणि अधिक प्रभावशाली परिणाम हवा असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. प्रसिद्ध लेखक शिव खेरा यांच्या मते, महान लोक वेगळे काही करत नसतात, ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करीत असतात. म्हणूनच ते महान असतात. याचाच अर्थ असा की, आपण कामातील एकसूरीपणा सोडून देणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment