स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी


मुंबई – राज्यात मोठ्या सत्तासंघर्षांनंतर काल शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. काल शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अन्य ६ मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला. यानंतर काही वेळातच मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.

आम्ही राज्याला चांगले सरकार देऊ, त्याचबरोबर दहशत वाटेल असे वातावरण होऊ देणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. यानंतर ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने त्रस्त झाले आहेत. ज्या योजना जाहीर केल्या त्याचे वास्तववादी चित्र समोर आणावे, असे आदेश उद्धव ठाकरेंनी मुख्य सचिवांना दिले आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देणार नाही, त्यांना भव्य दिव्य अशी मदत करू. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्यावर ज्यांनी टीका केली त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मंत्रिमंडळ हे राज्याचे आहे हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे म्हणत ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

सर्वसामान्य जनतेचे आमचे महाविकास आघाडीचे सरकार हे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे राज्यात दहशत वाटत असेल असे वातावरण राहणार नाही. आत्तापर्यंत शेतकऱ्यांवर फसवणुकीचा पाऊस पडला. आता मात्र, शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Leave a Comment