आजचा सूर्योदय नवा इतिहास रचणारा : सुप्रिया सुळे


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी एक ट्विट करत आज पार पडणाऱ्या शपथविधी बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचणारा आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू, असे म्हटले आहे.


आज सायंकाळी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी पार पडणार असल्यामुळे सत्तेत भागीदार असलेल्या तिन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेष आनंदाचे वातावरण सत्तास्थापनेच्या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले ट्विट याचकडे लक्ष वेधत आहे. सुळे यांनी ट्विट करत भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत आजचा सूर्योदय नवा इतिहास रचणारा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी त्यानिमित्ताने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक केलेल्या बंडामुळे तब्बल महिनाभरानंतर होऊ घातलेला शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी रखडला होता. सुप्रिया सुळे यांचे या बंडामुळे पक्षात वाढत जाणारे प्रस्थ कारण असल्याची चर्चा होती. त्यामुळे सुप्रिया सुळे गेला महिनाभर चर्चेत होत्या. त्यांच्या नावाची चर्चा अजित पवारांच्या बंडामुळे केलेल्या भावनिक ट्विट्समुळे वाढत गेली. पण, सुप्रियांच्या मुख्यमंत्रिपदाचा काही प्रश्नच नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर ही चर्चा थांबली. कालांतराने अजित पवार यांचे बंडही शमले आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले.

Leave a Comment