उद्धव ठाकरेंसोबत हे नेते देखील घेणार मंत्रिपदाची शपथ


मुंबई: आज शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी युवा सेनाप्रमुख आणि पहिल्यांदाच आमदार झालेले हे मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली. आज शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येक दोन मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना पक्ष वाढीची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याने मंत्रिपदाची शपथ त्यांना देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाही शपथविधी सोहळा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवार माघारी पतल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीतील मानाचे स्थान कायम असल्याचे बोलले जात होते. पक्षातील अजितदादांच्या समर्थकांनी झालेल्या साऱ्या गोष्टी विसरून अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे, असा आग्रहही धरला होता. मात्र, हा आग्रह पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मान्य नसल्याचे सांगितले जात असल्यामुळेच अजित पवार यांच्याऐवजी सध्याचे राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील हेच उपमुख्यमंत्री होतील, असे सूत्रांनी सांगितले.

तिन्ही पक्षांनी राज्यातील सत्तेचा ताळमेळ राखण्यासाठी सुनियोजित आखणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात केवळ एकच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडीच्या बैठकीतील निर्णयानुसार राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असून काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्यात येणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार आहे. विधानसभा अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हे असतील. ३ डिसेंबरच्या आत विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नवे मुख्यमंत्री पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment