शालेय मुलांच्या सुरक्षिततेचे पर्याय


दिल्लीमधील गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकत्याच घडलेल्या एका सात वर्षांच्या मुलाच्या हत्येच्या घटनेमुळे सर्व पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शालेय विद्यार्थी घरातून निघून शाळेमध्ये पोहोचण्याआधी काही अनुचित घटना घडल्याच्या बातम्या वरचेवर आपल्या कानी पडत असतात. पण रायन इंटरनॅशनल स्कूल मधील बाथरूममध्ये या सात वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर, शाळेमध्ये देखील आपली मुले सुरक्षित नाहीत ही भीती पालकांना ग्रासते आहे. शाळा देखील या बाबतीत आपली जबाबदारी योग्य रीत्या पार पाडण्यासाठी, सर्व आवश्यक ती खबरदारी घेताना दिसत आहेत. ट्रॅकिंग डीव्हाईस ( शोधक यंत्रे ) लावलेल्या आयडेंटीटी कार्ड्स पासून ते शाळेच्या बाथरूम्स मध्ये ही आवाजांचे ध्वनिमुद्रण करणारी यंत्रणा आता वापरात घेण्याचा अनेक शाळांनी निर्णय घेतला आहे. या सर्व माध्यमांद्वारे मुले शाळेच्या परिसरात कुठेही असली तरी त्यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

दिल्ली पब्लिक स्कूलने तेथील सर्व विद्यार्थांना रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीटी कार्ड्स दिली आहेत. ही अशी स्मार्टकार्ड्स आहेत ज्यांच्यामध्ये ट्रॅकिंग चिपचा वापर करण्यात आला आहे. या चिप द्वारे मुले शाळेच्या परिसरामध्ये नक्की कुठे आहेत याचा माग घेणे शालेय कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे. आणि केवळ शाळाच नाही, तर पालकांनाही ही माहिती मिळणार आहे. मुले घरातून निघताना बस मध्ये बसल्यापासून ते शाळेमध्ये पोहोचून बसमधून उतरल्याची माहिती या यंत्रणेमार्फत एसएमएस द्वारे पालकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.

शाळांच्या सर्व परिसरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरांची नजर तर असतेच, पण जिथे सीसीटीव्ही कॅमेरा वापरणे सहजी शक्य नाही, उदाहरणार्थ शाळांमधील वॉशरूम्स किंवा चेंजिंग रूम्स, अश्या ठिकाणी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे आवाज ध्वनिमुद्रित केले जातील अशी यंत्रणा वापरण्याचे निर्णय ही शाळा घेत आहेत. या सर्व माध्यमांद्वारे मुले शाळेच्या परिसरात असताना सुरक्षित राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment