उद्धव ठाकरेंचे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारले


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे हजर राहतील. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण दिले होते.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ही वचनपूर्ती होणार आहे. कारण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत थेट शिवसेना पक्षप्रमुखच बसणार आहेत. सोबतच विधीमंडळात आदित्य ठाकरे यांचीही एन्ट्री झालेली आहे. आतापर्यंत ठाकरे कुटुंबातून कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी असल्यामुळे राज ठाकरे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राज ठाकरे राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास आधीपासूनच व्यक्त केला जात होता. राज यांनी याआधीही ठाकरे कुटुंबाच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात साथ दिली आहे. राज ठाकरे फारकत घेतल्यानंतर बाळासाहेबांचं निधन असो, किंवा उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात स्वतः हजर राहिले होते. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नालाही उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली होती. आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment