फास्टॅग स्कॅनर खराब झाल्यास ?, हा आहे नियम

सरकारने 1 डिसेंबर 2019 पासून गाड्यांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. सरकार फास्टॅग अनेक ठिकाणी मोफत देखील देत आहे. फास्टॅगद्वारे आता टोलनाक्यावर रोख रक्कमे ऐवजी वॉलेटद्वारे पेमेंट करता येईल. यासाठी टोल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन करण्यासाठी रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (RFID)  लावण्यात येत आहे. मात्र समजा, तुम्ही टोलनाक्यावरून जात असताना आरएफआयडी स्कॅनर खराब झाले असल्यास पेमेंट कशा स्वरूपात कराल ? याबद्दल जाणून घेऊया.

एनएचएआयनुसार, जर एखाद्या टोल नाक्यावर आरएफआयडी स्कॅनर खराब झाल्यास आणि फास्टॅग स्कॅन होत नसेल तर अशा परिस्थिती वाहन चालकांना कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. यासाठी टोल प्लाझाला सुचना देण्यात आलेल्या आहेत.

नियमांनुसार, जर आरएफआयडी मशीन खराब झाली असल्यास, फास्टॅग स्कॅन होणार नाही व यामुळे टोल प्लाझाचे गेट उघडणार नाही. मात्र यावेळी नॅशनल हायवे फी नियमांनुसार, टोल प्लाझा संचालक तुम्हाला विना टोलचे जाऊन देईल. त्याचबरोबर मॅन्युअल पद्धतीने फीची पावती देखील फाडेल. जेणेकरून त्या गाडीची नोंद होईल. मात्र जर फास्टॅग लागलेले नसेल व तुम्ही टोल नाक्यावरून फास्टॅग लेनमधून जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी दुप्पट रक्कम भरावी लागेल. टोल नाक्यावर एक लेन विना फास्टॅग वाहनांसाठी देखील असेल, जेथे नियमित शुल्लक आकारले जाईल.

1 डिसेंबरपासून वाहनांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. वाहन जर ओव्हरलोड असेल तर ओव्हरलोडची देखील रक्कम कापण्यात येईल. अधिकाऱ्यांनुसार, कार, जीप, व्हॅनसाठी निळ्या रंगाचे फास्टॅग, हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी लाल आणि पिवळा रंग, बससाठी हिरवा व पिवळा रंग, मिनी बससाठी नारंगी रंग निश्चित करण्यात आला आहे.

याशिवाय ट्रक्सला त्यांच्या क्षमतेनुसार रंग देण्यात आले आहेत. 12 ते 16 हजार किलो वजनी ट्रकसाठी हिरवा रंग, 14200 ते 25 हजार किलोसाठी पिवळा रंग, 25 ते 54 हजार किलो वजनी ट्रकसाठी गुलाबी आणि 54200 पेक्षा अधिक वजनी ट्रकसाठी आकाशी रंगाचे फास्टॅग निश्चित करण्यात आले आहेत. तर जेसीबी व अन्य निर्माण कार्यासाठी वापरम्यात येणाऱ्या मशीनसाठी राखाडी रंगाचे फास्टॅग आहेत.

Leave a Comment