भाजपने सत्तेसाठी महाराष्ट्रात केलेले कांड लज्जास्पद: सोनिया गांधी


नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू, असे देखील त्यांनी म्हटले आहे. भाजपने महाराष्ट्रात सत्तेसाठी केलेले कृत्य लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.

आज, गुरुवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील लोकशाही नष्ट करण्याचे भाजपने केलेले प्रयत्न लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात भाजपच्या इशाऱ्यावर काम केले. भाजपचे हे कृत्य लज्जास्पद असून त्यांच्याकडून महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यपालांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेनेने पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर आता त्यांच्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही टीका केली. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच काम केले यात शंकाच नसल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचे सरकार येण्यापासून रोखण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आणि मोदी-शहा सरकारचा पर्दाफाश झाल्याचेही त्या म्हणाल्या. भाजपची इतर पक्षांसोबत असलेली निवडणूकपूर्व आघाडी अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळे टिकली नाही असे सांगत भाजपनं अनेक मित्र गमावले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment